शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे निवडणूक चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केल्यामुळे उद्धव ठाकरे व त्यांचे उरलेले सहकारी संतप्त होणे स्वाभाविक आहे. गेले चार महिने उद्धव ठाकरे, संजय राऊत व अन्य नेते घसा फोडून सांगत होते की, धनुष्यबाण आमच्याकडेच राहणार, बघू या कोण ते काढून घेतो, अशी भाषा वापरली जात होती. पण निवडणूक आयोगापुढे आलेली कागदपत्रे, पुरावे व आमदार-खासदारांचे संख्याबळ विचारात घेऊन एकनाथ शिंदे यांनी केलेला दावा आयोगाने मान्य करीत शिवसेना व धनुष्यबाण शिंदे गटाला दिल्याचे शुक्रवारी रात्री जाहीर केले. महाराष्ट्राची सत्ता गमावल्यावरही उद्धव व त्यांच्या निकटवर्तीयांचा अहंकार कमी झाला नाही, हेच दोन दिवसांत दिसले. मुख्यमंत्रीपदाची झूल गेली तरी ते जमिनीवर आलेच नाहीत.
रोज नुसत्या वल्गना व पोकळ धमक्या यातच ते वेळ घालवत आहेत. १९६६ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी पक्ष संघटना स्थापन केली. पुढे पक्ष विस्तारासाठी हिंदुत्वाची जोड दिली. भाजपबरोबर युती करून राज्यात काँग्रेस नामोहरम केली. पण मुख्यमंत्रीपदाच्या लोभापायी त्यांच्या पुत्राला आपल्या पिताश्रींनी किती कष्ट उपसले, किती घाम गाळला, शिवसैनिकांनी किती रक्त सांडले, याचा विसर पडला आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर बसून मुख्यमंत्रीपदाचा मुकुट मस्तकावर चढवला. महाराष्ट्रातील जनतेला हे मुळीच पटले नव्हते. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना घरात बसून काय केले, त्याची त्यांनी आता पुस्तिका काढावी म्हणजे महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेला त्यांनी काय काम केले ते समजेल. एकनाथ शिंदे हा नेता शिवसेना संघटनेचा मोठा आधार होता. पक्षातील चाळीस आमदार, पक्षाचे समर्थन करणारे दहा आमदार व तेरा खासदार त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येतात व उद्धव यांना आव्हान देतात, हे काही एका रात्रीत घडलेले नाही. उद्धव हे पक्षप्रमुख होते, पण सत्ता गेल्यावर ते आपला पक्षही संाभाळू शकले नाहीत. वडिलांनी उभारलेल्या वृक्षाची ते नीट देखभाल करू शकले नाहीत. पक्षातील असंतोष व खदखद ते थोपवू शकले नाहीत. पक्ष संघटनेकडे त्यांनी पुरेसे लक्ष दिले नाही. असंतोष शिगेला पेटला तेव्हाच पन्नास आमदार गुवाहाटीच्या दिशेने निघाले, तेव्हा त्याचेही गांभीर्य त्यांना समजले नाही. उद्धव यांचे निकटवर्तीय बंडखोर आमदारांची गद्दार व रेडे म्हणून टिंगल करीत राहिले. खोके म्हणून त्यांना हिणवत राहिले. हे सर्व नैराश्येतून ते बोलत होते, हे जनतेला चांगले समजत होते. पक्षाची मालकी गेली, पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले म्हणून आता आदळ-आपट करण्यात काय अर्थ आहे, ही पाळी उद्धव यांनी स्वत:च्या वागणुकीतूनच आणली आहे. स्वार्थ आणि केवळ मातोश्रीतील परिवाराचे हित यातून पक्षाला ओहोटी लागली. माझ्याजवळ तु्म्हाला देण्यासारखे आता काही नाही, असे सांगून तुमच्या जीवावर आपण लढतो आहोत, असे सांगणे हे नामुष्कीचे लक्षण आहे. राज्याची सत्ता असताना शिवसैनिकांसाठी काय केले हे कधी सांगू शकतील का? शिवसैनिक म्हणजे आपली कवचकुंडले, त्यांनी रस्त्यावर येऊन लढायचे आणि आता तर पेटवा आयुष्याच्या मशाली, असे सांगत आहेत. ज्यांनी पक्षासाठी पोलीस केसेस अंगावर घेतल्या, ज्यांनी पक्षासाठी दुसऱ्याशी पंगा घेतला, तुरुंगवास भोगला त्यांच्यासाठी काय केले, हे कधी सांगता येईल का? आठ महिन्यांपूर्वी वर्षावरून मातोश्रीवर परतल्यावर अशीच शिवसैनिकांची गर्दी जमवली होती, कोणी हनुमान चालिसा म्हणणार म्हणून तेव्हाही अशी गर्दी आणली होती, आता पक्षाचे नाव व चिन्ह गेले म्हणूनच ‘चलो मातोश्री’ असे आदेश निघाले. त्यातून पुढे काय झाले? या शिवसैनिकांना सत्तेवर आल्यावर कायमचा रोजगार, नोकऱ्या-व्यवसाय दिला असता तर त्यांच्या कुटुंबीयांनी नेतृत्वाला दुवा तरी दिला असता. भावनेच्या आधारावर व शिवसेनाप्रमुखांच्या पुण्याईवर किती दिवस अशी गर्दी जमवता येणार?
निवडणूक आयोगाने शेण खाल्ले असे भाष्य करणे म्हणजे पक्ष नेतृत्वाने पातळी सोडली आहे. गाडीच्या टपावर उभे राहून भाषण केले म्हणजे कॉपी होईल पण शिवसेनाप्रमुख कसे होता येईल? एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना चोर म्हणणे, निवडणूक आयोग व अन्य यंत्रणा भाजपच्या बटीक असल्याचे सांगणे, महाशिवरात्रीच्या आदल्या रात्री धनुष्यबाण चोरीला गेला म्हणून टाहो फोडणे, चोरांना लोक मारतील अशी धमकी देणे, ही सर्व भाषा वैफल्यग्रस्त मनोवृत्तीचे द्योतक आहे. बाळासाहेब ठाकरे हे केवळ उद्धव ठाकरे व त्यांच्या घरापुरते मर्यादित करणे हाच त्यांचा अवमान आहे. ते महाराष्ट्रातील सर्व जनतेचे आहेत व देशातील कोट्यवधी घरात त्यांच्याविषयी जनतेला अभिमान आहे. हिंदुहृदयसम्राट ही त्यांची ओळख आहे. मग त्यांना मातोश्रीपुरते मर्यादित का केले जात आहे? यापूर्वी नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे, गणेश नाईक यांनी शिवसेनाप्रमुख हयात असताना जय महाराष्ट्र केला होता. पण एकनाथ शिंदे यांनी केलेला जय महाराष्ट्र म्हणजे मातोश्रीवर भूकंप झाला. निवडणूक आयोगापुढे आपण का हरलो, याचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी उद्धव ठाकरे व त्यांचे निकटवर्तीय आयोगावर, एकनाथ शिंदेंवर व भाजपवर तोंडसुख घेत आहेत. तोल गेल्यासारखी त्यांची वटवट चालू आहे.