भिवंडी : भिवंडी शहर परिसरात चेन स्नॅचिंग व वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीची भावना वाढीस लागली आहे. शहरातील कामतघर, ओसवाल पार्क, भारत कॉलनी या भागात चेन स्नॅचिंगच्या चोऱ्यांच्या घटना वाढीस लागल्याने माजी उपमहापौर मनोज काटेकर यांनी पुढाकार घेत कामतघर मुख्य रस्ता, भारत कॉलनी, ओसवाल वाडी, पिस पार्क येथील मुख्य रहदारीच्या रस्त्यांवर स्वखर्चातून तब्बल १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.
शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांच्या शुभहस्ते या सीसीटीव्ही कॅमेरांचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी माजी शिक्षण समिती सभापती सुंदर नाईक, गोपीनाथ काटेकर, विशाल भोईर, शरद म्हात्रे, राम पाटील, रजनीश पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.