- अर्थभूमी: उमेश कुलकर्णी
एअर इंडियाने चारशे ते पाचशे लहानचणीची (नॅरोबॉडी) आणि बोईंग विमाने खरेदी करण्याचा करार केल्यानंतर आता टाटांची सर्वात मोठी स्पर्धक कंपनी इंडिगो आणि इतरही प्रवासी वाहतूक कंपन्यांनी एकंदर १२०० विमाने खरेदी करण्याची मागणी नोंदवली आहे. इंडिगोकडे अगोदरच सर्वाधिक संख्येने नॅरोबॉडी विमाने आहेत. या नव्या खरेदी करारांमुळे विमान वाहतूक क्षेत्राने आता गगनभरारी घेतली तर आहेच, पण रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्था सुधारण्यात आता ही खरेदी गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. इंडिगो आणि इतर विमान कंपन्या हा विमानांचा ताफा येत्या दोन वर्षांत खरेदी करून तो आकाशात उड्डाण करण्यासाठी सज्ज करतील. यातून भारतीय विमान वाहतूक क्षेत्र बहुप्रतिक्षित आणि ऐतिहासिक अशा बदलाच्या टोकावर आहे, असे म्हणता येईल. प्रत्येक विमान कंपनीने छोट्या-मोठ्या नवीन विमानांसाठी मागणी नोंदवली असली तरी सर्वात विशाल अशी मागणी मात्र इंडिगोने नोंदवली आहे. प्रवासी विमान वाहतूक क्षेत्रात कोरोनानंतर पुन्हा एकदा प्रचंड स्पर्धा तयार झाली आहे आणि ही एक चांगली बाब आहे. कारण पंतप्रधान मोदी यांनी भारताला पाच ट्रिलियन मूल्याची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न पाहिले असून त्यासाठी या मागण्या फार मोठे योगदान देणार आहेत.
टाटा खरेदी करणार असलेली फ्रेंच विमाने असोत की आता इंडिगोचे विमान खरेदी करार असोत, जे सध्या पाइपलाइनमध्ये आहेत आणि लवकरच पूर्णत्वास जाणार आहेत, त्यामुळे भारतात रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फार मोठे सहाय्य करणार आहेत. हे केवळ खरेदी करार नाहीत, तर अतिशय महत्त्वाकांक्षी असे आणि विमान वाहतूक क्षेत्राचे पुनरुज्जीवन करून त्या क्षेत्राला नवसंजीवनी देणारे आहेत. कोरोना काळात मागणी ठप्प झाली. कारण लोक घरातच होते. त्यामुळे सर्व क्षेत्रांप्रमाणेच विमान वाहतूक क्षेत्रालाही फटका बसला होता. आता लोकांनी रिव्हेंज पर्यटन म्हणजे सूड म्हणून पर्यटन करण्याचे ठरवले आहे. कोरोना गेल्यानंतर हे रिव्हेंज पर्यटन एखाद्या लाटेप्रमाणे सुरू असून त्यामुळेच विमान कंपन्यांचे इतक्या मोठ्या मागण्या नोंदवण्याचे धाडस झाले आहे. या विमान खरेदी करारांमुळे भारताच्या एक जागतिक स्तरावरील उदयोन्मुख देश अशा मान्यतेला मोठीच बळकटी मिळणार आहे. भारतीय विमान कंपन्यांच्या या खरेदी करारांमुळे अमेरिकन अध्यक्ष ज्यो बिडेन आणि इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही भारताचा गौरव केला आहे. भारतीय कंपन्यांच्या या निर्णयामुळे रोजगार क्षेत्रात कमालीचे चैतन्य येणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतही या निर्णयाचे पडसाद भारतासाठी लाभदायक ठरणार आहेत. इंडिगोने तीनशे विमान खरेदीची मागणी कोरोनापूर्वी नोंदवली होती. आता त्यांच्या ताफ्यात दोन वर्षांत त्यांच्याकडे पाचशे विमानांची भर पडणार आहे. इंडिगो हीच टाटांची खरी स्पर्धक आहे. त्यामुळे टाटांनी चारशे विमानांची मागणी नोंदवल्यावर इंडिगो कशी मागे रहाणार? विमान वाहतूक क्षेत्राचे कोणत्याही अर्थव्यवस्थेला योगदान तीन प्रकारे मोजता येते.
रोजगार निर्मिती, जीडीपीतील योगदान आणि प्रवाशांची वाहतूक. जीडीपीतील (सकल देशांतर्गत उत्पन्नातील योगदान) भारतीय विमान वाहतूक क्षेत्राचा वाटा आहे ७२ अब्ज डॉलर्स (ही २०२१ ची आकडेवारी आहे). १२१ दशलक्ष आंतरराष्ट्रीय आणि ४१ दशलक्ष देशांतर्गत प्रवासी भारतीय विमान कंपन्यांनी प्रवास करतात. ही आकडेवारी २८ डिसेंबर २०२२ ची आहे. अर्थात सध्या तरी भारत सर्वोच्च पाचमध्ये नसला तरीही जगातील नवव्या क्रमांकाचे क्षेत्र भारतीय हवाई क्षेत्र आहे. भारतीय प्रवासी विमान वाहतूक कमालीच्या वेगाने वाढत आहे. भारतात सध्या एकूण विमानांची संख्या सातशे आहे. भविष्यात भारत अमेरिकेलाही मागे टाकणार आहे. कारण भारतीय प्रवाशांचे विमानाने प्रवास करण्याचे प्रमाण अफाट वाढले आहे. यामुळे विमातळांवर अद्ययावत सुविधा तयार करून नवीन हरितक्षेत्र विमानतळ तयार करण्याचे कामही सुरू आहे. यातही रोजगार निर्मितीला जागा आहेच. विमानांतील अद्ययावत सुविधा आणि विमानांना उशीर न होणे ही तत्त्वे पाळली तर ही संख्या आणखी वाढेल. या दृष्टीने नवी अत्याधुनिक विमाने भारतात येत आहेत. २०२१ च्या आर्थिक वर्षात भारतातील प्रवासी वाहतूक ही अंदाजे ११५.३७ दशलक्ष होती. यावरून या क्षेत्राचा महाकाय आवाका लक्षात यावा. विमान वाहतूक क्षेत्राचे पर्यटन क्षेत्र वाढण्यातही मोठे योगदान आहे. कारण पर्यटनाला विमानपवासाची जोड असतेच. परदेशी प्रवासासाठी तर विमानांशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे ही दोन्ही क्षेत्रे हातात हात घालून वाटचाल करत असतात. विमाने सामान्यांच्या काय कामाची, ही जुनी विचारधारा आता कालबाह्य झाली आहे. वेतन वाढले तसे मध्यमवर्गीयांच्या विमान प्रवासाच्या आकांक्षांना पंख मिळाले आणि ते आव्हान साकार करण्यासाठी हे क्षेत्रही सज्ज झाले. अर्थात १९९१ मध्ये भारताची दारे उदारीकरणासाठी खुली झाल्यानंतर संपन्न मध्यमवर्गीयांनी विमान प्रवास करण्यास सुरुवात केली. विमान वाहतूक हाही प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. बड्या माध्यमांनी केवळ विमान कंपन्या आणि विमान वाहतूक क्षेत्राचे वार्तांकन करण्यासाठी खास वार्ताहर कक्ष नेमला आहे. यावरून या क्षेत्राचे भारतातील महत्त्व लक्षात येईल. पूर्वी ही चैन केवळ पाश्चात्त्य माध्यमांना परवडत होती. नवीन विमान खरेदी करार हे भारतासाठी गेम चेंजर ठरणार आहेत, हे निश्चित.