Wednesday, April 23, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखमुली म्हणजे वस्तू किंवा साधन नव्हेत...

मुली म्हणजे वस्तू किंवा साधन नव्हेत…

थोर समाजसेवक, समाजसुधारक, साधु-संत, विचारवंत यांची शिकवण, मार्गदर्शन, चळवळ आदींच्या माध्यमांतून पुरोगामित्व प्राप्त झालेल्या आपल्या महाराष्ट्रात कधी-कधी अशा काही घटना घडतात की, राज्याच्या या पुढारलेपणाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावे. गाव-खेड्यांपासून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक यांसारख्या शहरांमध्ये वरचेवर घडणाऱ्या घटना वाचनात आल्या की, आपण माणूस असल्याचीच आपल्याला लाज वाटावी. लव्ह – जिहादसारख्या घटना पाहिल्या तर विविध जाती, धर्म, पंथीयांमध्ये बंधुत्वाचे नाते निर्माण झाले आहे की नाही, असा प्रश्न पडावा. मानवतेला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना घडत असतात. साताऱ्यातील अशाच एका घटनेप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र भाषेत संताप व्यक्त केला आहे. एका जन्मदात्या आईने एक वर्षाच्या पोटच्या मुलीला आर्थिक गरजेपोटी कर्ज घेऊन विकले होते. पती कारागृहात असल्याने आलेल्या आर्थिक चणचणीमुळे जन्मदात्या आईने आपले एकवर्षीय मूल काही पैशांसाठी विकण्याचा निर्णय घेतला. सदर महिलेची आर्थिक असहायता पाहून तिची एक वर्षाची मुलगी बाबर नामक दाम्पत्याने आपल्या ताब्यात घेऊन तिला कर्जरूपात पैसे दिले. कालांतराने त्या महिलेने कर्जाची परतफेड केल्यानंतर आपली मुलगी परत मिळावी अशी मागणी केली. त्या कर्जाची परतफेड केल्यानंतर महिलेने आपले विकलेले मूल तिच्याकडून परत मागितले. मात्र तिने ते मूल परत करण्यास नकार दिल्यानंतर जन्मदात्या आईने पोलिसांकडे याची तक्रार दाखल केली.

त्यानुसार पोलिसांनी मूल विकत घेणाऱ्या जोडप्यावर भारतीय दंड संहितेच्या मुलांची तस्करीच्या कलमाखाली व बाल न्याय हक्क आणि संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणी महिलेच्या पतीसह आणखी एकाला जामीन मंजूर केला. मात्र मूल विकत घेणाऱ्या महिलेला दिलासा देण्यास नकार दिला. त्या निर्णयाला महिलेने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर हायकोर्टाने आपली खंत व्यक्त करताना हे प्रकरण माणुसकीला काळिमा फासणारे आहे असे म्हटले आणि ‘मुलीची विक्री’ हा शब्दच मुळी वेदनादायक असल्याचे यावेळी स्पष्ट केले. आज २१व्या शतकातही मुलींना वस्तू समजले जाऊन आर्थिक फायद्यासाठी तिचा वापर होणे हे दुर्दैवी आहे.

मात्र, नाण्याची दुसरी बाजूही पाहणे आवश्यक आहे. जन्मदात्या महिलेचा पती तेव्हा कारागृहात होता, उदरनिर्वाहासाठी तिला त्यावेळी पैशांची नितांत गरज होती, अशा स्थितीत जन्मदात्या आईला हे पाऊल उचलावे लागले. मात्र, मूल विकत घेणाऱ्या महिलेने मानवतेला लज्जा निर्माण होणारे कृत्य केले आहे. आर्थिक चणचण असलेल्या महिलेची एक वर्षाची मुलगी विकत घेणाऱ्या आरोपी महिलेच्या जामीन अर्जावरील आदेशात न्यायालयाने आपला उद्वेग मांडला. या प्रकरणात ‘विक्री’ हा शब्द वापरण्यास खूप यातना होत आहेत; परंतु हे आपल्या समाजातील अत्यंत विदारक वास्तव आहे. आज आपण २१व्या शतकात असूनही मुलींकडे वस्तू आणि साधन म्हणून वापर करण्याची प्रवृत्ती अस्तित्वात आहे व त्यातूनच वस्तू म्हणून पाहत त्यांचा वापर आर्थिक लाभांसाठी केला जात आहे. या प्रकरणात आरोपींनी त्या महिलेला अनधिकृतपणे कर्ज देऊन तिची मुलगी घेतली. त्यांनी मानवतेला काळिमा फासत आक्षेपार्ह कृत्य केले. इतकेच नव्हे तर आईने कर्जफेड केली असतानाही तिची मुलगी तिला परत देण्यास नकार दिला. हे सर्व अत्यंत आक्षेपार्ह आहे.

पैशाच्या हव्यासापोटी मुलीच्या आईने तिला विकले हे जीवनातील कटू सत्य आहे. तसेच आरोपींनी मूल विकत घेऊन मानवतेविरुद्ध पाप केले आहे असेच म्हणावे लागेल. तसेच मुलीच्या आई-वडिलांनी कर्जाची परतफेड केली व त्यानंतरही मुलीला परत करण्यास दाम्पत्याने नकार देऊन ‘हम करे सो कायदा’ या म्हणीप्रमाणे एकप्रकारे कायद्यास आव्हानच दिले आहे. विक्री करण्यात आलेले बाळ आता तिच्या जन्मदात्यांकडेच आहे. न्यायालयात खटल्याला सुरुवात होऊन तो कधी संपणार त्याबाबत काहीच माहिती नाही. अशातच निकाल लागेपर्यंत महिलेला कारागृहात ठेवणे योग्य नाही. कारण, त्या महिलेलाही स्वतःची दोन मुले आहेत, असे निरीक्षण नोंदवून हायकोर्टाने आरोपी महिलेला जामीन मंजूर केला आहे. जगात तिसरी महाशक्ती होण्याच्या दिशेने भारताची घोडदौड सुरू असताना, आधुनिकतेची कास धरून समाज उत्तरोत्तर प्रगती करीत असताना अघटित अशा घटना घडल्यास आपल्या प्रगतीला काळिमा फासला जातो आणि सारे काही दिखाऊ, कामचलाऊ असल्यासारखे वाटते.

स्त्री-पुरुष समानतेच्या आणि त्या दृष्टीने झपाट्याने प्रगती साधत असलेल्या आपल्या समाजात आजही मुलींना वस्तू म्हणून समजले जाऊन तशी वागणूक दिली जाते त्यांचा आर्थिक लाभांसाठी वापर केला जात असेल, तर माणूस म्हणवून घेण्यात आपण फार मोठी गफलत करत अहोत असेच म्हटले पाहिजे. नैतिकता आणि मानवी हक्कांच्या तत्त्वानुसार हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. त्यामुळे अशा घटना घडू नयेत म्हणून समाजात वावरताना प्रत्येकाने जागल्याची भूमिका बजावायला हवी. यासारख्या घटना टाळण्यासाठी समाज जागृती आणि समाज शिक्षणाची नितांत गरज आहे. तसेच या प्रकारच्या अप्रिय घटना घडू नयेत याची काळजी सत्ताधाऱ्यांनी, समाजधुरिणांनी आणि आपण सर्वांनी घेणे क्रमप्राप्त आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -