दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या ६३ वर्षांच्या इतिहासात दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवर भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियाला एकही कसोटी सामना जिंकू दिलेला नाही. असा सहा दषकांचा मोठा इतिहास आपल्या बाजूने असलेल्या दिल्लीच्या खेळपट्टीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२३’मधील दुसरा कसोटी सामना आजपासून रंगणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना गमावल्याने ०-१ अशा पिछाडीवर पडलेल्या ऑसींसमोर दिल्लीच्या खेळपट्टीवर राजेपण मिरवणाऱ्या यजमानांचा खडतर पेपर सोडविण्याचे मोठे आव्हान आहे.
मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकूनही ऑस्ट्रेलियाला दारूण पराभवाला सामोरे लागले होते. दरम्यान शुक्रवारपासून दिल्लीतील खेळपट्टीवर मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. दिल्लीची खेळपट्टी कांगारूंसमोर भलतीच नाराज आहे. त्याचाही भलामोठा इतिहास आहे. गेल्या ६३ वर्षांपासून दिल्लीत टीम इंडियावर मात करणे कांगारूंना शक्य झालेले नाही. १९५९ मध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा शेवटचा पराभव केला होता. दिल्लीच्या खेळपट्टीवरील विजयातील सातत्य राखण्यात भारताला यश येणार की, निराशाजनक इतिहास पुसण्यात कांगारू यशस्वी होणार? हे हा सामना संपल्यानंतरच कळेल.
भारतीय संघ सध्या चांगलाच लयीत आहे. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा ही फिरकीपटूंची जोडगोळी कमालीची फॉर्मात आहे. या दोघांनी पहिल्या सामन्यात कांगारूंचा खुर्दा पाडला. त्यामुळे ऑसींसमोर या जोडीला रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे. ऑसींच्या फलंदाजांनीही निराशा केली आहे. पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावांत त्यांच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. सुमार फलंदाजी त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले, तर गोलंदाजांच्या अपयशाने ते पराभवाच्या अधिक खाईत गेले. त्याउलट भारताचा खेळ राहिला आहे. भारताच्या गोलंदाजांनी खेळपट्टी ओळखून योग्य टप्प्यावर चेंडू फेकत पाहुण्यांवर सुरुवातीपासूनच दबाव टाकला. त्या अडचणीतून सावरणे पाहुण्यांना जमले नाही. त्याउपर भारतीय फलंदाजांनी कौतुकास्पद खेळ केला आहे. ज्या खेळपट्टीवर पाहुण्यांचे फलंदाज स्थिरावू शकले नाही, तिथे रोहित सेनेने ४०० धावांचा टप्पा गाठला. रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी अशी फलंदाजी केलीच, शिवाय रविंद्र जडेजा, अक्षर पटेल या फिरकीपटूंनीही लक्षवेधी फलंदाजी केली. त्यामुळे दोन डाव खेळूनही कांगारूंना भारताच्या एका डावाएवढी धावसंख्या करता आली नाही.
दरम्यान दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल राहिली आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये या खेळपट्टीवर चांगली धावसंख्या नेहमीच पाहायला मिळते. अरुण जेटली स्टेडियमची छोटी आणि वेगवान बाउंड्रीही फलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. फिरकीपटूंनाही येथे चांगली मदत मिळते. अशा स्थितीत दोन्ही संघांचे फिरकीपटू पहिल्या सामन्याप्रमाणे येथेही वर्चस्व गाजवू शकतात.