नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता असलेल्या महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा थरार ४ मार्चपासून रंगणार असून अंतिम सामना २६ मार्चला खेळवला जाणार आहे. पाच संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक बीसीसीआयने बुधवारी जारी केले. नवी मुंबईतील डी वाय पाटील मैदानावर मुंबई आणि गुजरातमध्ये पहिला सामना रंगणार आहे.
पुरुष आयपीएलच्या धर्तीवर यंदा प्रथमच बीसीसीआयतर्फे महिला आयपीएलचे आयोजन केले आहे. सोमवारी या स्पर्धेकरिता खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. भारताकडून स्मृती मन्धानाला चांगली मागणी असल्याचे पहायला मिळाले. आरसीबीने स्मृतीला ३.४० कोटी रुपयात खरेदी केले. ती भारताची सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. दरम्यान या लिलावानंतर चाहत्यांना या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत उत्सुकता होती. मात्र बुधवारी या स्पर्धेचे वेळापत्रक चाहत्यांसमोर आले. महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामाला चार मार्चपासून सुरुवात होणार आहे. नवी मुंबईतील डी वाय पाटील मैदानावर मुंबई आणि गुजरातमध्ये पहिला सामना रंगणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना बेब्रोन स्टेडिअमवर २६ मार्च रोजी रंगणार आहे. बीसीसीआयने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, चार डबल हेडर सामने असणार आहेत. पाच संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.