अलिबाग (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय सिटी ग्रुपचे मालक अनिरुद्ध देशपांडे यांच्या रायगड जिल्ह्यातील रोहा येथील फार्मवर आयकर विभागाने आज छापा घातला. चार गाड्यांमधून आलेल्या आयकरचे अधिकारी व पोलिसांनी ही कारवाई केली. त्यात काय सापडले याचा तपशील मिळाला नाही. परंतु या कारवाईमुळे रायगडमध्ये खळबळ माजली आहे.
पुण्यातील सिटी ग्रुपचे मालक अनिरुद्ध देशपांडे यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. एफसी रोडवरील सिटी ग्रुपच्या ऑफिसवर छापे मारण्यात आले आहेत. देशपांडे यांच्या सिटी ग्रुपशी संबंधित ८ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. यात डेक्कन आणि मगरपट्ट्याजवळ अॅमनोरा येथील कार्यालयांचा समावेश आहे. प्राप्तीकर खात्याचे अधिकारी येथे झाडाझडती घेत असताना तिकडे रायगडमध्ये आयटीने मोठी कारवाई करीत रोहा केळतवाडी फार्मवर धाड टाकली आहे. जवळपास १४ वाहनांमधून आलेले आयकर विभागाचे अधिकारी व पोलिस देशपांडे यांच्या फार्मवर धडकले. त्यांनी फार्महाऊसची झडती घेऊन तपासणी केली.
अनिरुद्ध देशमुख हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. सिटी ग्रुप हा पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील आघाडीचा समूह आहे. अनिरुद्ध देशपांडे यांनी सिटी ग्रुपची स्थापना केली असून, ते या समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. पुण्यात सिटी ग्रुपचे अनेक व्यावसायिक व रहिवासी प्रकल्प आहेत.