मुंबई: जयंत पाटील यांचा वाढदिवस उद्या असला तरी त्यांच्या वाढदिवसाची आजच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मलबार हिल परिसरात लावलेल्या बॅनर्सनी सर्वांचे लक्ष वेधुन घेतलेय. यात जयंत पाटील यांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा करण्यात आला आहे.
या बॅनर्सवर जयंत पाटील यांच्या फोटोसोबतच संतोष पवार आणि हितेंद्र सावंत या दोन पदाधिकाऱ्यांचे फोटो दिसतात तर यावर #बॉस आणि माझं दैवत असंही लिहिलेलं आहे. महत्वाचे म्हणजे, हे पोस्टर्स नेपियन्सी रोडवर लावण्यात आले आहेत. जिथे जयंत पाटील यांचे घर आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस मलबार हिल तालुका यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. दरम्यान, याची चर्चा सध्या समाज माध्यमांवर जोरदार सुरु आहे.
दरम्यान, एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी सकारात्मक उत्तर दिले होते. आता त्यांचीच इच्छा त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली असं म्हणायचं का?