नवी दिल्ली : आयसीसीच्या क्रमवारीत टीम इंडिया टी-२०, वन डे आणि कसोटीमध्ये अव्वल स्थानावर पोहचली आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडिया क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकाच वेळी पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे.
आज जाहीर झालेल्या कसोटी संघाची क्रमवारी अपडेट होताच टीम इंडियाने यातही नंबर १ स्थान पटकावले आहे. रोहित हा जगातील पहिला कर्णधार बनला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-१ ठरला आहे.
सध्या टी-२० संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे तर वनडे आणि कसोटी संघाची कमान रोहित शर्माकडे आहे. वनडे आणि टी-२० क्रमवारीत भारतीय संघ आधीच अव्वल आहे.
आयसीसीने जारी केलेल्या ताज्या क्रमवारीत टीम इंडिया ११५ गुणांसह पहिल्या स्थानावर पोहचली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ १११ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. अलीकडेच त्यांनी दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर पराभूत केले होते. इंग्लंड १०६ गुणांसह तिसऱ्या, न्यूझीलंड १०० गुणांसह चौथ्या, तर दक्षिण आफ्रिका ८५ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
आयसीसीने ट्वीट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. त्याशिवाय सोशल मीडियावरही चाहत्यांकडून टीम इंडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.