‘योगयोगेश्वर जय शंकर’ या लोकप्रिय मालिकेत बालगंधर्वांची भूमिका लोकप्रिय अभिनेता अभिजीत केळकर साकारणार आहे. शंकर महाराजांच्या दिव्यत्वाचा अनुभव ज्यांनी ‘याची देही याची डोळा’ घेतला त्या बालगंधर्वांच्या गोष्टीला आता मालिकेत सुरुवात होत आहे.
बालगंधर्व यांचा शंकर महाराजांशी असलेला ऋणानुबंध, त्यांनी महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती कशी अनुभवली? कसे महाराजांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या आयुष्याला एक दिशा दिली यांचा उत्कट प्रवास मालिकेत बघायला मिळणार आहे. बालगंधर्व हे मराठी रंगभूमीवरील एक अद्वितीय गायक-अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. मराठी माणसाच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेल्या व्यक्तींच्या यादीत बालगंधर्वांचा समावेश आहे. मराठी जनतेने बालगंधर्वांवर प्रेमाचा अक्षरशः वर्षावच केला, अशा अद्वितीय बालगंधर्वांसोबत शंकर महाराजांची भेट कशी घडली? तो अविस्मरणीय प्रसंग काय होता? हे प्रेक्षकांना मालिकेद्वारे बघण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अभिजीत केळकर म्हणाला, जेव्हा मला याबाबत विचारणा झाली, तेव्हा पासून खूप उत्सुकता होती आणि मला ही भूमिका करायचीच होती, त्यामुळे मी होकार दिला. अभिजीत केळकर एक गुणी, लोकप्रिय अभिनेता असून अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे.या आधी ‘बिग बॉस मराठी’मध्ये झळकला होता.