एका गावात एक शाळा होती. अगदी सगळ्या गावात असते तशीच. बैठी आणि कौलारू. पुढे भले मोठे पटांगण, पटांगणात उभे एक वडाचे झाड. झाडाच्या पारंब्या अन् त्यावर मनसोक्त खेळणारी मुले! याच शाळेत एक मुलगा होता. नाव त्याचं होतं विजय. पण सारी शाळा त्याला विजू नावानेच ओळखायची. कारण विजू खूपच चांगला मुलगा होता. साऱ्यांशी मिळून-मिसळून वागायचा. तो हुशार होता, सुसंस्कृत होता. तो सर्व खेळात भाग घ्यायचा. सांस्कृतिक कार्यक्रमात पुढे असायचा. कधी वर्ग सांभाळणे असो वा कधी सहलीच्या वेळी पुढाकार घेणे असो विजय सर्वात पुढे. त्यामुळे तो मुलांबरोबरच सरांचादेखील लाडका होता.
रोज शाळेत येणारा विजय एक आठवडाभर शाळेत आलाच नाही. सगळी मुले एकमेकांना विचारू लागली. अरे विजय कुठे आहे? तो शाळेत का येत नाही? सरांनी काही मुलं विजूच्या घरी धाडली. पण घराला कुलूप होते. शेजाऱ्यांनाही काहीच माहीत नव्हते. ही वार्ता मुख्याध्यापकांनी पोलिसांना कळवली. पण विजयचा शोध काही लागला नाही.
बरोबर वीस दिवसांनी विजय अचानकपणे शाळेत हजर झाला. तेव्हा त्याचे तोंड सुजले होते. अंगावरचे कपडे फाटले होते. तो तडक मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये शिरला. त्याचे डोळे पाण्याने डबडबलेले होते. विस्कटलेले केस अन् अंगावर माराचे वळ दिसत होते. विजय शाळेत आल्याचे कळताच सारे शिक्षक मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये आले. सरांनी त्याला खुर्चीत बसवले. प्यायला पाणी दिले. “काय झाले विजय? इतके दिवस कुठे होतास? तुझ्या अंगावर हे वळ आणि रक्ताचे डाग कसे काय?” सरांनी चौकशी करताच विजूचा बांध फुटला. तो ओक्साबोक्सी रडू लागला. सर विजयच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले, “बोल विजय काय घडलं तुझ्यासोबत!”
विजय सांगू लागला, “त्या दिवशी नेहमीप्रमाणे मी शाळेत यायला निघालो. तेव्हा रस्त्यात एक गरीब माणूस भीक मागत होता. लोकांकडे पैसे मागत होता. तो खूपच खंगलेला दिसत होता. मला वाटले तो बरेच दिवस उपाशी असावा. मला त्याची दया आली. मी त्याला माझा डबा देऊ केला, पाण्याची बाटली त्याच्या पुढे ठेवली. त्याने अगदी अधाशासारखा डबा खाल्ला. घटाघटा पाणी प्यायला. मला खूप समाधान वाटले. एका गरिबाला आपण मदत केली याचा मला अभिमान वाटला! पण का कुणास ठाऊक. जेवून झाल्यावर तो माझ्याकडे एकटक बघू लागला, मीही त्याच्याकडे बघू लागलो. मग तो उठला अन् चालू लागला. मीदेखील त्याच्या पाठोपाठ चालू लागलो. पुढे काय घडले मला काहीच आठवत नाही! जेव्हा भानावर आलो तेव्हा मी एका जंगलात पोहोचलो होतो. तिथे खूप लोक होते. त्यांच्या अंगावर लष्करी गणवेश होता. हातात बंदुका होत्या. तिथे माझ्यासारखीच बरीच मुलं होती. सारा प्रकार माझ्या लक्षात आला. मी सावध झालो. तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा त्या लोकांनी मला खूप मारहाण केली. दोन-दोन दिवस उपाशी ठेवले. हळूहळू माझ्या लक्षात आले. त्यांच्याशी वैर धरून उपयोग नाही. मग ते सांगतील ते ऐकू लागलो. त्यांनी मला सैनिकी शिक्षण द्यायला सुरुवात केली. बंदूक चालवणे, कवायती करणे, दहा-दहा किलोमीटर धावणे असे नाना विषय ते मला शिकवू लागले. असे किती दिवस उलटून गेले ते मलाच कळले नाही.”
“मग एक दिवस मी पळून जायचा विचार केला. मध्यरात्री दोन तीन वाजण्याची वेळ मला योग्य वाटत होती. त्या रात्री मला झोप अशी आलीच नाही. मी झोपेचे केवळ नाटक करीत होतो. सगळे कधी झोपतात. कधी एकदाची सामसूम होते याची मी वाट बघत होतो. मग हळूच कानोसा घेत उठलो. झोपडीच्या बाहेर पडलो. ती अमावास्येची रात्र असावी. कारण आकाशात चंद्र दिसत नव्हता. थोड्याफार चांदण्या तेवढ्या लुकलुकत होत्या. मी हळूहळू दबक्या पावलाने थोडा लांबपर्यंत चालत गेलो अन् मग जीवाच्या आकांताने धावत सुटलो. घनदाट जंगल, काळीकुट्ट रात्र! झाडं-झुडपं, काटेकुटे, दगडधोंडे यांना कधी चुकवत, तर कधी ठेचकाळत मी पळत होतो. कधी झाडांना धडकत होतो, तर कधी वेलीत पाय अडकून पडत होतो. हात-पाय रक्तबंबाळ झाले. पायाची बोटं फुटून गेली. पण थांबलो नाही की रडलो नाही. कारण, त्या लोकांना कळलं असतं, तर त्यांनी मला जिवंत सोडलं नसतं. बराच वेळ मी वेड्यासारखा पळत होतो. कपडे घामाने भिजून गेले होते. छातीचा भाता जोरजोरत हालत होता. शेवटी माझ्या सुदैवाने मला जंगलातला एक छोटेखानी डांबरी रस्ता लागला. मला थोडेसे हायसे वाटले. तिथंच थोडा वेळ दबा धरून बसलो. जरा विश्रांती घेतली. तेवढ्यात त्या किर्र जंगलात गाडीचा आवाज ऐकू आला. माझ्या अंगावर सरर्कन काटाच आला. ते बंदुकधारी तर नसतील ना! पण एक भला मोठा ट्रक समोर आला. त्यावर मोठमोठी लाकडे होती. माझ्या लक्षात आले ही त्या लोकांची गाडी नाही. चटकन जाऊन मागच्या बाजूने गाडीला लोंबकळलो. कसाबसा वर चढून एका दोरीला धरून उभा राहिलो. पुढे कितीतरी वेळ मी मागे लटकूनच प्रवास केला आणि मग गाड्या बदलत बदलत इथपर्यंत पोहोचलो.”
विजय म्हणाला, “सर ते लोक माझा शोध घेत असतील. ते इथपर्यंत पोहोचले, तर मी काय करू? मला भीती वाटते.” सर म्हणाले, “शाब्बास विजू, तू मोठी बहाद्दुरी दाखवलीस, काळजी करू नकोस.” सरांनी तडक पोलिसांना शाळेत बोलवून घेतलं. विजूने सांगितलेल्या वर्णनावरून त्यांनी लगेचच ओळखले. ते बंदुकधारी म्हणजे नक्षलवादीच आहेत. त्यांनी मोठा फौजफाटा घेऊन नक्षलवाद्यांवर चढाई केली. जवळ जवळ पन्नास नक्षलवादी मारले गेले व तेवढेच पकडले गेले. मोठा शस्त्रसाठा पोलिसांच्या ताब्यात आला. तेथे पकडून ठेवलेल्या वीस-पंचवीस मुला-मुलींची देखील त्यांनी सुटका केली. सरकारतर्फे विजयला बालश्री पुरस्कार जाहीर झाला. शिवाय २५ लाखांचे इनामही मिळाले. शाळेतर्फे गाववाल्यांनी देखील विजयचा भव्य सत्कार करून गावातून मिरवणूक काढली. त्यावेळी सर हळूच विजयचा कानात पुटपुटले, “विजय या पुढे कुणाला मदत करताना सावधगिरी बाळग बरं का!”
-रमेश तांबे