मुंबई (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने मुंबईत चर्चगेट येथील आझाद मैदानात ११ ते १९ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय संस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे.
मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी भारतातील विविध राज्यांमध्ये या महोत्सवाचे आयोजन केले जाते. हा महोत्सव २०१९ मध्ये मध्य प्रदेशात, २०२२ मध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि आता महाराष्ट्रात याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत सरकारचे केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी असतील. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संस्कृती राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता, महिला आणि बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या ९ दिवसांच्या महोत्सवात सहभागी होण्यासाठी संपूर्ण भारतातील सुमारे ३५० लोककलाकार आणि आदिवासी कलाकारांसह सुमारे ३०० स्थानिक लोककलाकार, काही ट्रान्सजेंडर आणि दिव्यांग कलाकार, प्रसिद्ध शास्त्रीय कलाकार तसेच प्रसिद्ध स्टार कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे.