Thursday, July 10, 2025

कबड्डीपटू केशरीनाथ पवार यांचे निधन

कबड्डीपटू केशरीनाथ पवार यांचे निधन

मुंबई (वार्ताहर) : महाराष्ट्र कबड्डी संघाचे माजी संघनायक केशरीनाथ पवार यांचे गुरुवारी पहाटे आकस्मित निधन झाले. निधनासमयी ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी किशोरी, दोन मुलगे, सुना व नातू असा परिवार आहे. बुधवारी त्यांना अस्वस्थ वाटल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालविली.


पवार यांनी ना. म. जोशी मार्ग आल्हाद सेवा मंडळ येथून आपल्या कबड्डी खेळाला सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक हा त्यांचा पहिला व्यावसायिक संघ होता. काही काळ ते मध्य रेल्वेकडून देखील खेळले. पण महिंद्रामध्ये खऱ्या अर्थाने त्यांची कारकीर्द गाजली. १९७० ते ८० हे दशक त्यांनी गाजविले. त्यांनी ३ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी मुंबई बरोबरच महाराष्ट्राचेही नेतृत्व केले.

Comments
Add Comment