३५० मुले-मुली अंधारात, थंडीच्या दिवसात थंड पाण्याने आंघोळ!
शिवाजी पाटील
शहापूर : शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचे दोन लाखांचे वीजबिल गेल्या चार महिन्यापासून थकल्याने महावितरणने शिरोळ आश्रमशाळेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे आश्रम शाळेत निवासी असलेल्या ३५० विद्यार्थ्यांना अंधारात रात्री काढाव्या लागत आहेत. हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त असल्याने मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आला आहे.
शहापूर एकात्मिक आदिवासी प्रकल्पाच्या माध्यमातून आश्रमशाळेचे कामकाज पाहण्यात येते. एकूण विद्यार्थी संख्या ६५० पेक्षा जास्त आहे. त्यापैकी ३५० विद्यार्थी कायमस्वरूपी वसतिगृहात वास्तव्यास आहेत. चार महिन्यांपासून आश्रमशाळेचे वीज बिल न भरल्याने त्याची रक्कम दोन लाख झाली होती. सोमवारी सायंकाळी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आश्रमशाळेत जाऊन वीजपुरवठा खंडित केल्याने आश्रम शाळेमध्ये सर्वत्र अंधार पसरला.
थकित वीज बिलासंबंधी अप्पर आयुक्त ठाणे व नाशिक यांच्याशी पत्रव्यवहार केला असून निधी मंजूर होताच वीज बिल भरणा करण्यासंबंधी सांगूनही विद्युत महाममंडळाने वीजपुरवठा खंडित केला आहे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आर. एच. किल्लेदार यांनी सांगितले.
सौरऊर्जेवर चालणारे काही दिवे तात्पुरत्या स्वरूपात सुरू केले आहेत. तसेच २० जानेवारी व ३० जानेवारीला वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला लेखी पत्र देऊन काही दिवसांचा अवधी मागितला. मात्र त्यांनी वीजपुरवठा खंडित केल्याने ३५० मुले व मुली अंधारात बसले आहेत. सकाळी थंडीत त्यांना थंड पाण्यात आंघोळ करावी लागणार आहे. – प्रभाकर जाधव, मुख्याध्यापक