ग्रामिण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या सुजाताची यशस्वी भरारी
शहापूर : शहापूर तालुक्यातील शिरगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तम गुणांकाने उत्तीर्ण झालेल्या सुजाता रामचंद्र मडके यांची ठाणे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्तीपत्र देऊन सुजाता यांना सन्मानित केले.
एकीकडे पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमात शिकवण्याचा घाट घालत असताना आणि दुसरीकडे विद्यार्थी संख्येअभावी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर असताना शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या सुजाता मडके हिने एमपीएससी परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे.
दरम्यान, शहापूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी सुजाता हिची भेट घेत शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच सुजाताच्या वडिलांचे देखील कौतुक केले. यावेळी शिरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य रवींद्र मडके, माजी आमदारांचे खासगी सचिव कुमार भोईर उपस्थित होते. तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे शहापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे, वामन केदार यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवरांनी सुजाताचे कौतुक केले आणि संपूर्ण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.