Wednesday, April 23, 2025
Homeमहत्वाची बातमीआत्मनिर्भर भारतासाठी उद्योजक होऊन योगदान द्या : केंद्रीय मंत्री नारायण राणे

आत्मनिर्भर भारतासाठी उद्योजक होऊन योगदान द्या : केंद्रीय मंत्री नारायण राणे

वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे नॅशनल एससी - एसटी हब संमेलनाचे आयोजन

मुंबई : आत्मनिर्भर भारतासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील नवउद्योजकांना २०१६ मध्ये नॅशनल एससी – एसटी हब आणले आहे. या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या नवउद्योजकांनी केंद्र सरकारच्या मदतीने रोजगार निर्माण करावेत. सकल देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी आणि देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी युवकांनी उद्योजक होऊन योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.

मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय, राज्याच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने आयोजित नॅशनल एससी – एसटी हब संमेलनात केंद्रीय मंत्री श्री. राणे बोलत होते.

मंत्री श्री. राणे यांनी सांगितले की, देशात रोजगार निर्माण करताना उद्योजकही तयार करायचे आहेत. उद्योजक बनविण्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाचे योगदान आहे. सध्या देशात ६ कोटी ४० लाख उद्योजक असून ११ कोटी कामगारांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. यामुळे देश आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला आहे. भारताचा जीडीपी ३.५ टक्के असून तो पाचवर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या भारत पाचव्या क्रमांकावर असून २०३० मध्ये अमेरिका, चीननंतर तिसऱ्या स्थानी नेण्याचे स्वप्न प्रधानमंत्र्यांनी पाहिले आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवउद्योजकांनी उद्योग उभे करून योगदान द्यावे. नवउद्योजकांना केंद्र सरकारच्या योजनांतर्गत कर्ज उपलब्ध होते. यावर सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाकडून २५ ते ३५ टक्के सबसीडी देण्यात येत आहे. नोकरी आणि उद्योगामध्ये फरक असून उद्योगांमध्ये फार मोठ्या संधी आहेत. यासाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण असून कष्ट घेण्याची तयारी नवउद्योजकांनी ठेवावी. समाजहित, देश आणि कुटुंबासाठी औद्योगिक प्रगती महत्वाची आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेवून उद्योजक व्हा. समाजाचे दु:ख पुसण्यासाठी स्वत: आर्थिक सक्षम व्हा, असे आवाहनही मंत्री श्री. राणे यांनी केले.

यावेळी मंत्री श्री. राणे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात शून्यातून उद्योजक बनलेल्या नितीन बनसोड, दिनेश खराडिया, सुनील चव्हाण आणि अप्पा वाघ या चार उद्योजकांचा सन्मान करण्यात आला.

केंद्र सरकारच्या विविध योजनांद्वारे एससी-एसटी समाज घटकातील उद्योजकांना मदत करण्यात येत असल्याचे प्रास्ताविकात श्रीमती इपाओ यांनी सांगून सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी बी. बी. स्वेन, योगेश भांबरे, प्रांजळ साळवे, सुनील शिंदे, इशिता गांगुली-त्रिपाठी, मनोजकुमार सिंग, राजेंद्र निंबाळकर, प्रशांत नारनवरे, सुनील झोडे, रवीकुमार यांनी नवउद्योजकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमस्थळी विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते.

यावेळी केंद्रीय सचिव बी.बी. स्वेन, सहसचिव श्रीमती मर्सी इपाओ, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड अॅफरमेटिव्ह अॅक्शनचे चेअरमन सुनील झोडे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष सुनील शिंदे, डॉ. विजय कलंत्री, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत कुमार, उद्योग विभागाच्या अतिरिक्त आयुक्त इशिता गांगुली-त्रिपाठी, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाचे क्षेत्रीय व्यवस्थापक मनोजकुमार सिंग आदी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -