Thursday, June 12, 2025

भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदाचा राजीनामा देणार!

भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदाचा राजीनामा देणार!

राष्ट्रपतींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त


मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राजीनामा देणार आहेत. खुद्द राज्यपालांनीच राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालविण्याचा मानस पंतप्रधानांना कळवला असल्याची माहिती समोर आली आहे.


मुंबईत पीएम मोदी विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले. त्यावेळी झालेल्या भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करू इच्छितो अशी इच्छा राज्यपालांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे व्यक्त केली. याबाबतची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.


राजभवनातून जारी झालेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्यासाठी अहोभाग्य होते.


गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.


'पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशीर्वाद मिळत राहील,' असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


दरम्यान, राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, त्यामुळे राज्यपाल हे राष्ट्रपतींना उत्तरदायी असतात. त्यामुळे त्यांनी राष्ट्रपतींकडे मागणी करायला हवी होती, अशा प्रतिक्रिया आता शिवसेना नेत्यांकडून व्यक्त होत आहे.


याआधीही राज्यपाल सत्यपाल मलिक आपल्या वक्तव्याने देखील चर्चेत राहीले होते. तरीही त्यांचा कार्यकाळ पूर्ण होवू दिला होता. त्यानंतर ते निवृत्त झाले. पश्चिम बंगालचे राज्यपाल धनखड यांच्या बाबतीत देखील असेच घडले होते. आता कोश्यारी यांनी इच्छा व्यक्त केली आहे. परंतू त्यांनी इच्छा व्यक्त केली की त्यांचा राजीनामा घेतला जाईल की त्यांची बदली होईल, हे लवकरच समजेल.

Comments
Add Comment