Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीसत्तेसाठी बाळासाहेबांनी कधीही तडजोड केली नाही : मुख्यमंत्री

सत्तेसाठी बाळासाहेबांनी कधीही तडजोड केली नाही : मुख्यमंत्री

मुंबई : सत्तेसाठी बाळासाहेबांनी कधीही तडजोड केली नाही, मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी कधीही विचारांशी तडजोड केली नाही, आज त्यांचाच विचार ऐकून आम्ही काम करतोय, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. बाळासाहेब रिमोट कंट्रोल चालवायचे, पण ते दुसऱ्यासाठी, स्वत:ला काही पाहिजे म्हणून त्यांनी कधीही रिमोट कंट्रोल चालवला नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले. विधान भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये आज बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एकेकाळी महाराष्ट्रात प्रस्थापितांची सत्ता होती, बाळासाहेबांनी सर्वसामान्यांपर्यंत ही सत्ता पोहोचवण्याचं काम केलं. कुणालाही राजकीय पार्श्वभूमी नसताना, बाळासाहेबांनी त्यांना आमदार, खासदार आणि मंत्री केलं. एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबातला मुलगा आज राज्याचा मुख्यमंत्री आहे, ही जादू फक्त बाळासाहेबांचीच आहे. बाळासाहेबांचे विचार ऐकताना आजही उर्जा मिळते, प्रेरणा मिळते. एकदा शब्द दिला की तो फिरवायचा नाही ही बाळासाहेबांची शिकवण, आम्ही ती पाळली. बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख आणि गुरुही होते. आज आनंद दिघे असते तर त्यांना अभिमान वाटला असता. बाळासाहेबांनी आदेश द्यायचा आणि ठाण्यात त्याचं पालन व्हायचं. ठाणं आणि शिवसेना हे नातंच वेगळं होतं. वयाच्या 16 व्या वर्षापासून मी बाळासाहेबांसोबत काम केलं, त्यांची भाषणं ऐकली. आज त्यांच्या विचाराचं सरकार स्थापन केलं. आज मी मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचं तैलचित्र लावण्यात येतंय हा दुर्मिळ क्षण आहे. एकेकाळी महाराष्ट्रात प्रस्थापितांची सत्ता होती, बाळासाहेबांनी सर्वसामान्यांपर्यंत ही सत्ता पोहोचवण्याचं काम केलं. आनंद दिघेंचा मृत्यू झाल्यानंतर बाळासाहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

पाकिस्तान कुणालाही घाबरत नव्हता, पण तो फक्त बाळासाहेबांना घाबरायचा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एवढं मोठं उत्तुंग व्यक्तीमत्त्व असतानाही नागरिकांच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडेही बाळासाहेब लक्ष द्यायचे, त्यामुळेच गेली 25 वर्षे ठाण्याची सत्ता ही बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जगातली कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही, आता त्याचा अनुभव आम्ही घेतोय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. बाळासाहेबांच्या ९७व्या जयंतीनिमित्त विधानभवनात हे तैलचित्र लावण्यात आले आहे. चित्रकार किशोर नादवडेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले हे तैलचित्र असून विधानभवनातील मुख्य सभागृहात ते लावण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विरोधीपक्ष नेते अजित पवार, अंबादास दानवे, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे प्रमुख राज ठाकरे, अॅड. निहार ठाकरे, स्मिता ठाकरे, रामदास कदम, गजानन किर्तीकर, चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर, बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आदी मान्यवर उपस्थित होते.

तैलचित्र बसविण्याचा प्रवास

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच त्यांनी विधान भवनात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र विधान भवनात बसवण्याबाबत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे मागणी केली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळाच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात तैलचित्र लावण्याचे जाहीर केले. त्यानुसार २३ जानेवारी रोजी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला गेला.

बाळासाहेबांचं आम्हाला वेड होतं – नारायण राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेबांप्रती जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलताना ते बाळासाहेबांच्या आठवणीत रमले. म्हणाले, आम्ही साहेबांचे कडवट, प्रामाणिक शिवसैनिक यांच्यापलिकडे होतो, साहेबांचं आम्हाला वेड होतं. माननीय बाळासाहेबांबद्दल बोलताना, कौतुक करताना त्यांना ज्यांनी अनुभवलं, त्यांच्या सहवासात होते त्यांना त्यांच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार आहे. मला आजही असं वाटतं की साहेब आज हवे होते. माझ्या आयुष्यात कोणी नव्हतं. मी कोकणातील एका शेतकऱ्याचा मुलगा, शिक्षणासाठी मुंबईत आलो. १९६६ जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला, तेव्हा मी १५ वर्षाचा असताना शिवसेनेचा सभासद व्हायला गेलो. त्यानंतर साहेबांची कोणतीही सभा मी सोडली नाही. साहेबांचा कडवट, प्रामाणिक शिवसैनिक यांच्यापलिकडे आम्ही होतो. साहेबांचं आम्हाला वेड होतं. आजच्या शिवसैनिकांबद्दल मी काही बोलणार नाही.

मी बाळासाहेबांचा वैचारिक वारसदार – राज ठाकरे

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या खुमासदार शैलीत भाषण करत स्व. बाळासाहेबांच्या आठवणी सांगितल्या. स्व. बाळासाहेबांच्या नावाच्या अगोदर जवळपास तीन ते सव्वातीन वर्षांनंतर हिंदूहृदयसम्राट हे नाव लागत आहे, त्याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे राज ठाकरे यांनी अभिनंदन व्यक्त केले. तसेच मी बाळासाहेबांचा वैचारीक वारसदार असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात जबरदस्त टोलेबाजी केली. वारसा हा वास्तूचा नसतो तर विचारांचा असतो. माझ्याकडे काही आलं असेल तर तो विचारांचा वारसा आला आहे आणि तो मी जपला आहे. संस्कार कुणी करत नसतो, संस्कार समोरच्या व्यक्तीच्या कृतीतून वेचायचे असतात, अशा आठवणी राज ठाकरे यांनी यावेळी सांगितल्या. या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित असलेले अनेकजण आणि उपस्थित नसलेले अनेकजण… यांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले, “ज्या व्यक्तीमुळे ही विधानभवनाची इमारत तुम्हाला बघायला मिळाली त्या स्व. बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र या इमारतीमध्ये लागत आहे, त्याबद्दल अभिमान वाटतो. शेकड्याने लोक विधानभवनात आली, मा. बाळासाहेबांनी त्यांना इथे पाठवले. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विनंती आहे की, त्यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेतही बाळासाहेबांचे तैलचित्र लावावे. म्हणजे आपण कुणामुळे विधान भवनात आलो, हे त्यांना कळेल.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -