कराची : महागाई आणि आर्थिक संकटाशी झगडणाऱ्या पाकिस्तानला आता वीज संकटाला देखील तोंड द्यावे लागत आहे. सोमवारी संपूर्ण पाकिस्तानात वीजपुरवठा खंडीत झाला. इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीसारखी पाकिस्तानातील मोठी शहरे अनेक तासांपासून अंधारात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानवर संकट कोसळले आहे. दैनंदिन वापरात असलेल्या सर्वच वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मागील आठवड्यात केंद्र सरकारकडून अन्न वाटप करताना नागरिकांमध्ये हाणामारी झाली होती. तर आता पाकिस्तानमध्ये वीज व्यवस्था बिघडली आहे.
पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पाकिस्तानच्या नॅशनल ग्रीडची सिस्टम फ्रिक्वेन्सी बिघडली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने देशभरातील वीज यंत्रणा प्रभावित झाली आहे. दुरुस्तीचे काम सुरू आहे. पाकिस्तानच्या मीडिया संस्थांनीही कराची, लाहोरमधील अनेक भागात वीज नसल्याचे सांगितले आहे.
उर्जा मंत्री खुर्रम दस्तागीर यांनी जिओ न्यूजला सांगितले की, वीज बचतीसाठी हिवाळ्यात पाकिस्तानामध्ये वीजनिर्मिती युनिट्स बंद ठेवले जातात. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जेव्हा यंत्रणा चालू केली. तेव्हा उत्तर पाकिस्तानातील क्षेत्राच्या व्होल्टेजमध्ये दबाव आला. त्यामुळे एकामागून एक अशी यंत्रणेत बिघाड होत गेली. माध्यमांतून सांगण्यात येत आहे की, वीज यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी ८ ते १० तास लागू शकतात. त्यामुळे लोकांना वीजेविना काही तास राहावे लागणार आहे.
गेल्यावर्षी देखील ऑक्टोबरमध्येही पाकिस्तानमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर कराची, लाहोरसारख्या शहरांमध्ये सुमारे १२ तास वीजपुरवठा झाला नव्हता.