फसवणारा व्हीडिओ शेअर करणाऱ्या संजय राऊत यांना नितेश राणे यांचा टोला
मुंबई (प्रतिनिधी) : प्रचंड गर्दी असलेला मराठा मोर्चाचा जुना व्हीडिओ शेअर करून हा महाविकास आघाडीचा शनिवारी निघालेल्या महामोर्चाचा व्हीडिओ असल्याचे समाजमाध्यमांवर भासवण्याचा प्रयत्न करणारे शिवसेना उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांना भाजप आमदार नितेश राणे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. हा मराठा मोर्चा आहे, महामोर्चा नव्हे, किती खोडसाळपणा असल्याचा टोला नितेश राणे यांनी ट्वीट करत लगावला आहे.
नितेश राणे म्हणाले की, शिवछत्रपतींच्या वंशजांचे दाखले मागायचे, मराठा क्रांती मोर्चाला ‘मुका मोर्चा’ म्हणून हिणवायचं आणि त्याच मराठा मोर्चाच्या पदराखाली आपले अपयश लपवायचे, अशा वृत्तीच्या संजय राऊत यांचा निषेध करतो. त्यांनी मराठा समाजाची माफी मागायला हवी अशी आग्रहीही मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
हा मराठा मोर्चा चा आहे !
किती naughty पणा हा !!!
— nitesh rane (@NiteshNRane) December 18, 2022
शनिवारी महाविकास आघाडीतर्फे महामोर्चा निघाला होता. प्रत्यक्षात या मोर्चाला अल्प प्रतिसाद मिळाला होता. मात्र आपले हे अपयश झाकण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव गटाच्या नेत्यांकडून होत असल्याचे खासदार संजय राऊत यांच्या व्हीडिओ व्हायरल करण्यावरून समोर आले आहे. संजय राऊत यांनी तुफान गर्दी असलेला मराठा मोर्चाचा जुना व्हीडिओ ट्वीट करत मविआचा शनिवारी निघालेला हाच मोर्चा असल्याचे या व्हीडिओच्या माध्यमातून भासवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर सतर्क असलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत त्यांचा समाचार घेतला आहे. हा मराठा मोर्चा आहे, महामोर्चा नव्हे… किती खोडसाळपणा आहे, असे ट्वीट करत नितेश राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.