राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपच्या नेत्यांकडून वारंवार होत असलेल्या महापुरुषांच्या कथित अपमानाच्या विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, कम्युनिस्ट आणि इतर काही छोटे पक्ष यांच्या महाविकास आघाडीने मोठा गाजावाजा करीत काढलेला महामोर्चा प्रत्यक्षात निघाला तेव्हा त्याला महामोर्चा का म्हणावे असाच प्रश्न सर्वसामान्यांना पडला असेल. राज्यात अलीकडेच सत्तेवरून पायउत्तर व्हावे लागलेल्या बलाढ्य? अशा तीन पक्षांच्या आणि त्यांच्या मोठ्या नेत्यांच्या आग्रहावरून काढण्यात आलेल्या या मोर्चाला अल्पप्रतिसाद मिळाल्याने या मोर्चाचा फज्जा उडाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेले कथित आक्षेपार्ह विधान तसेच महापुरुषांबद्दल भाजप नेत्यांनी केलेल्या काही विधानांचा निषेध करण्यासाठी आणि राज्यपालांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी मुंबईत महाविकास आघाडीने महामोर्चा नावाचा घाट घातला होता. पण त्यात ते पुरते अपयशी ठरले आणि तोंडावर पडले हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
राज्यपाल कोश्यारी आणि महाविकास आघाडी यांचे संबंध सर्वंनाच ठाऊक आहेत. सत्ता गमावल्यापासून त्यांना राज्यपालपदी कोश्यारी नकोसे झाले आहेत, असेच एकूण वातावरण दिसत आहे. त्यातूनच त्यांनी कोश्यारी हटावची भूमिका रेटण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. खरं म्हणजे राज्यपाल पद हे घटनाधिष्टित पद असून तेथे स्थानापन्न झालेल्या महनीय व्यक्तींना विशेषाधिकार असतात. त्यांची नेमणूक केंद्र सरकारच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींमार्फत केली जाते. त्यामुळे अशा घटनादत्त पदावर बसलेल्या व्यक्तीला महामोर्चे काढून, दबावतंत्र वापरून दूर करणे कुणालाही शक्य नाही. ही गोष्ट राजकारणातील धुरिणांना ठाऊक असायला हवी. त्यामुळे या नेत्यांनी महामोर्चा काढून जनतेचा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा वेळ, पैसा फुकट दवडला आहे, असेच म्हणायला हवे. बरं मोर्चाला जमणाऱ्यांची संख्या अवाच्या सव्वा म्हणजे दीड लाख, दोन लाख तर कोणी तीन लाखांपर्यंत जाईल, असे छातीठोकपणे सांगत होते. पण वास्तवात मोर्चासाठी आलेल्यांची संख्या ही जेमतेम २५ ते २७ हजारांपर्यंतच होती. याचाच अर्थ महामोर्चा काढून सरकारविरोधात फार मोठा रोष आहे हे दाखविण्याचा किंवा भासविण्याचा विरोधकांचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे.
हा हल्लाबोल महामोर्चा शिंदे – फडणवीस सरकारला धडकी भरवणारा असेल, असे सांगितले जात होते. मात्र वास्तवात जमलेले अथवा जमविलेल्या मोर्चेकऱ्यांची तुटपुंजी संख्या पाहून महाआघाडीचे नेते हिरमुसले असतील आणि भ्रमनिरास झाल्याने त्यांनाच ‘धडकी’ भरली असावी. गंमत म्हणजे महामोर्चाचे एक नेते उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाला ‘विराट’ अशी उपमा दिली होती. पण कोणत्याही बाजूने तो विराट नव्हता. तीन पक्ष एकत्र येऊन जर मोर्चाचे स्वरूप असे लहान असेल, तर त्यांना आपल्या घटलेल्या बळाबाबत विचार करायला हवा.
मुंबईत झालेल्या मोर्चाचा कुठल्याही चॅनेलने ड्रोन शॉर्ट दाखवलेला नाही. सगळे शॉर्ट क्लोजअप होते. कारण ड्रोन शॉर्ट घेण्याइतपत लोकांची गर्दी या मोर्चात नव्हती. जमणाऱ्या मार्चेकऱ्यांनी आझाद मैदान भरू शकणार नाही हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही ठाऊक होते, म्हणूनच जिथे रस्ता निमुळता होतो, म्हणजे जेजेचा पूल ही जागा त्यांनी मोर्चासाठी निवडली. आझाद मैदानाचा एक कोपराही ते भरू शकले नसते. म्हणजेच उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष जसा नॅनो होत चालला आहे, तसाच हा नॅनो मोर्चा होता, असा टोला मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाणला आहे.मविआच्या महामोर्चासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने पैसे देऊन लोक जमविल्याचा आरोप करण्यात आला असून ती गोष्टही गंभीरच आहे. हा आरोप करताना भाजपने एक व्हीडिओ शेयर केला आहे. मुंबईतील पत्रकार संघाच्या जवळ असलेल्या काँग्रेस कार्यालयाजवळ मोर्चा सुरू असतानाचे दृश्य त्यात दिसत आहे. अशा प्रकारचे जे व्हीडिओ बाहेर येत आहेत, ते अत्यंत लाजीरवाणे आहेत. गंमतीची गोष्ट म्हणजे जे लोक मोर्चासाठी आले होते त्यांना ते कशासाठी आले आहेत, हेच ठाऊक नव्हते. कोणत्या पक्षाचा हा मोर्चा आहे हे त्यांना माहिती नव्हते. अशा प्रकारे पैसे वाटूनही मविआचे नेते मोर्चासाठी लोक जमवू शकलेले नाहीत. त्यामुळे सरकारविरोधात जनतेच्या मनात असंतोष आहे हे स्पष्ट होत आहे. म्हणजेच महाविकास आघाडीकडून महापुरुषांच्या नावाने केवळ आणि केवळ राजकारण केले जात असल्याचे उघड होत आहे. महाविकास आघाडीच्या वतीने आज काढण्यात आलेला मोर्चा हा केवळ राजकीय मोर्चा होता. त्यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत. जे संतांना शिव्या देतात. हिंदू देव-देवतांना, वारकरी संप्रदायाला शिव्या देतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला हे ज्यांना माहीत नाही. कुठल्या साली झाला हे माहीत नाही, असे लोक कोणत्या तोंडाने मोर्चा काढतात. त्यांना मोर्चा काढण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाही, असेच म्हणायला हवे. महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान होऊ नये असे सर्वांचेच मत आहे. पण जाणीवपूर्वक मुद्द्यांचे भांडवल करून त्याचे राजकारण करायचे हा महाआघाडीचा डाव फसला आहे.