मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील पाऊस हा अनेक ठिकाणी पाणी साचवतोच. त्यातच पश्चिम उपनगरात अनेक सखल भागात पाणी (water) साचण्याची समस्या उद्भवते. अंधरी सब वे परिसर आणि आजुबाजूला दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते. ही समस्या सोडविण्यासाठी मोगरा नाल्याची रुंदी वाढवण्यात येणार आहे. त्यासोबतच अनेक ठिकाणी नवीन मलनि:सारण वाहिनी टाकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या कामासाठी महापालिका १०१ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.
मुंबई महापालिकेने हिंदमाता, सायन आणि मिलन सब वे परिसरातील पाणी तुंबण्याची समस्या बऱ्यापैकी कमी केली आहे. तसेच अंधेरीतील पाणी तुंबण्याची समस्या सोडविण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यात मिल्लत नगर, लोखंडवाल कॉम्प्लेक्स, भारदवाडी रोड, कालव्हर्ट ते जेपी रोड, डी एन रोड, मेट्रो स्टेशन (क्रिस्टल मॉल), मोगरा नाला अशी नवीन मलनिःसारण वाहिनी टाकण्याचे प्रस्तावित आहे.
वीरा देसाई रोड, कालव्हर्ट कोर्ट यार्ड, दत्ताजी साळवी मार्ग ते आरटीओ जंक्शन, लिंक रोड, सिटी मॉल ते मोगरा नाल्यापर्यंत मलनिःसारण वाहिनी टाकण्यात येणार आहे. या तीन प्रस्तावांवर एकूण १०१ कोटी ४५ लाख ५६ हजार ३३५ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी आला असून मंजुरीनंतर काम सुरू केले जाईल. येत्या दोन वर्षांत हे काम ठेकेदाराला पूर्ण करायचे आहे.