नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्विटर खरेदी केल्यापासून एलॉन मस्क (Elon Musk) यांच्यावर सातत्याने टीकेचा पाऊस पडत आहे. घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयामुळे एलॉन मस्क अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. कर्मचारी कपातीचा निर्णय मस्क यांच्या चांगलाच अंगलट येऊ शकतो. कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्याचा फटका ट्विटरमधल्या एका गर्भवती महिलेलाही बसला; पण ही महिला कर्मचारी शांत बसली नाही. तिने नोकरी गेल्यानंतर ट्विट करत संताप व्यक्त केला. एवढेच नाही तर ‘आता भेट थेट कोर्टातच!’ असा इशाराही दिला आहे.
शेनन लू असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. डेटा सायन्स मॅनेजर असलेल्या लू या सहा महिन्यांच्या गर्भवती आहेत. मस्क यांनी सुरू केलेल्या कर्मचारी कपातीचा फटका त्यांना बसला. त्यांनी या प्रकरणी मस्क आणि ट्विटरला न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे. करारानंतर ट्विटर अधिकृतरित्या मस्क यांच्या मालकीचे झाले आहे; पण या करारमध्ये काही चढउतार आले आहेत. मस्क आता न्यायालयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. डेलावेअर कोर्टाच्या आदेशानुसार, त्यांना करारातल्या अटी आणि शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे. कंपनीची सूत्रे हाती येताच मस्क यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय राबवला. त्यांनी सर्वात अगोदर कंपनीचे ‘सीईओ’ पराग अग्रवाल यांच्यासह तीन प्रमुख अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. मस्क यांनी कर्मचाऱ्यांवर कपातीचा वरवंटा फिरवला. त्यांनी अर्ध्याधिक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. सध्या कंपनीत केवळ ३७०० कर्मचारी उरले आहेत. या कपातीच्या त्सुनामी लाटेत शेनन लू यांचीही नोकरी गेली. त्यांनी ट्विटरच्याच माध्यमातून संतापाला वाट मोकळी करून दिली.
शेननलू यांनी नोकरीतून काढून टाकल्याच्या विरोधात मस्क आणि ट्विटरला कोर्टात खेचण्याचा इशारा ट्वीट करूनच दिला आहे. त्यांनी मस्क यांना कोर्टात खेचण्याची प्रतिज्ञाच घेतली आहे. त्या फेसबुकची मुख्य कंपनी मेटामध्ये काम करत होत्या. या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी २०२२ मध्येच त्या ट्विटरमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांनी ट्विटरवर, मस्कवर खटला दाखल केला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.