मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईमध्ये अनेक भागांत जलवाहिन्यांच्या गळतीमुळे शेकडो लिटर पाणी वाया जाते. हे वाया जाणारे पाणी वाचवण्यासाठी पालिकेकडून (BMC) प्रयत्न सुरू असून सध्या कुर्ला परिसरातील जलवाहिन्यांची गळती पालिकेने थांबवली आहे. गेल्या २२ महिन्यांत १०९२ ठिकाणी गळती झालेल्या जलवाहिन्या पालिकेने दुरुस्ती केल्या आहेत.
मुंबईतील अनेक दाटीवाटीच्या परिसरातून पालिकेच्या जलवाहिनी जातात. त्यापैकी एक परिसर म्हणजे कुर्ला. कुर्ला परिसरात जाणाऱ्या जलवाहिन्यांच्या बाजूला अनेक घरे देखील आहेत. या ठिकाणी असलेल्या परिसरातील जलवाहिन्यांची गळती होत असते. या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया, तर मोठ्या प्रमाणात पाणी चोरीलाही जाते. वाया जाणारे पाणी वाचवण्यासाठी पालिकेने प्रयत्न केले असून गेल्या २२ महिन्यांत पालिकेने कुर्ला परिसरात १०९२ ठिकाणी जलवाहीन्यांची गळती दुरुस्ती केली आहे.
कंत्राटदाराकडून महापालिकेने २४ ऑगस्ट २०२० ते ३० जून २०२२ या कालावधीमध्ये जलवाहिन्यांच्या १०९२ गळत्या दूर केल्या आहेत. सिमेंट काँक्रिटीकरणामुळे तसेच पावसाळी गटारांमधून जाणाऱ्या २३ जलवाहिन्या हलवल्या आहेत. तर ४१ जुन्या जलवाहिन्यांची बदली केली आहे. दरम्यान त्याच कंत्राटदारला पालिकेने पुढील दोन वर्षांसाठी गळती दुरुस्ती व जलवाहिनी बदलीसाठी १३ कोटींहून अधिक रकमेचे कंत्राट दिले आहे.