मी बेळगावचा एक रहिवासी. मी कामानिमित्त पिंगुळीला शेख कॉन्ट्रॅक्टरमार्फत आलो होतो. मी त्यावेळी राऊळ महाराज, अण्णा यांच्याबद्दल जाणत नव्हतो. मी येथे असताना अण्णांनी समाधी मंदिराचे काम आमच्याकडे दिले. समाधी मंदिराचे बांधकाम चालू झाले. मी इकडे नवीन असल्यामुळे वाईट संगतीत पडलो. मित्रमंडळींसोबत दारू पिऊ लागलो. अण्णा म्हणजे माझ्यासारखाच कामगार आहे असे मला वाटायचे. ते शेख साहेबांना सांगायचे, येथेच आंघोळ करा व कामाला सुरुवात करा. घाण करू नका. मी पण हे ऐकत होतो. पण सवयीचा गुण. मला तर दारूचे भयंकर व्यसन होते.
त्यानंतर एकेदिवशी कामावर असताना माझा हात बराच सुजला होता. काम करायला मिळत नव्हते. अण्णा आम्हाला सर्वांना चहा आणून देत असत. त्यादिवशी पण अण्णा चहा घेऊन आले. माझ्याकडे पाहून त्याने विचारले, ‘हाताक काय झाला?’ मी त्यांना सांगितल्यावर त्यांनी गरम चहा माझ्या हातावर ओतला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशीच माझा हात पूर्णपणे बरा झाला. तेव्हा मी इतर सहकाऱ्यांकडे अण्णाबद्दल चौकशी केली. तेव्हा मला सांगितले हे अण्णा आहेत. राऊळ महाराजांचे पुतणे असून तेच सर्व दुकान सांभाळतात. तेथे कर्ते सवर्ते अण्णाच आहेत. तेव्हा अण्णांबद्दल माझ्या मनांत भक्तिभाव उत्पन्न झाला व मी त्यांना प्रेमभावाने नमस्कार केला. आमचे काम पण चालूच होते व दारू पिणेसुद्धा बंद झाले नव्हते. मी तर पुरता त्यात बुडून गेलो होतो.अशाच प्रकारे आमचे काम कुडाळला चालू होते. तेव्हा मी आणखी दोघा कामगारांसोबत दररोज काम संपल्यावर दारू पिऊन घरी(खोलीवर) यायचो. असाच एके रात्री आम्ही तिघेही भरपूर दारू पिऊन स्कूटरवरून येत होतो. रात्र पण बरीच झाली होती. येता येता वाटेत एका ठिकाणी आमची स्कूटर झाडावर आदळली व आम्ही तिघेही बेशुद्ध पडलो. तेव्हा कुणीतरी पाहून पोलिसांना कळविले. पोलिसांनी अण्णांना फोन करून सांगितले. अण्णांनी आम्हाला सावंतवाडी हॉस्पिटलात दाखल करण्याची विनंती केली. आम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर आमची तपासणी वगैरे झाली. त्यात माझ्या हाताचे हाड मोडलं होतं. त्यामुळे कामावर काही जाता येत नव्हते.
आणि मुख्य म्हणजे समाधीच्या कळसाचे काम चालू होते. मीच मुख्य कामगार असल्यामुळे सर्व काम बंद ठेवावे लागले असते. अण्णांना हे शेख कॉन्ट्रॅक्टरने सांगितले. तेव्हा अण्णा म्हणाले, ‘सुरेशला घेऊन खोलीवर या. मग बघू काय करायचे ते. अण्णांनी मला खोलीवर आल्यानंतर नवनाथ वाचायला सांगितला आणि आमच्या चुलीतील राख अंगाऱ्याच्या रूपाने माझ्या हाताला लावली, आश्चर्य घडले. प. पू. राऊळ महाराजांच्या कृपेने आणि अण्णांच्या आशीर्वादाने माझा हात बरा झाला. त्यानंतर मी दारू पितो हे अण्णांना समजलेच होते. त्यामुळे मला दररोज दारू न पिण्याबद्दल सांगत होते. पण मला ते पटत नव्हते. खरे सांगायचे म्हणजे मी ऐकायच्या मन:स्थितीत नव्हतो. शेवटी अण्णांनी मला सांगितले, सुरेश तू आता सावंतवाडीला राम राम ठोक आणि इकडे पिंगुळीतच येऊन राहा. मी तुला जमीन घेऊन देतो. येथेच घर बांधून राहा. आता माझा संसार सुखात चालला आहे. मला घड्याळाची आवड होती. माझ्याकडे एक घड्याळ होते पण व्यवस्थित चालत नव्हते. एकेदिवशी अण्णांनी मला विचारले, ‘सुरेश आता किती वाजलेत?’ मी अण्णांना सांगितले माझे घड्याळ बंद आहे. तेव्हा अण्णांनी मला ते घड्याळ चहामध्ये टाकायला सांगितले. मी त्याप्रमाणे १० मिनिटे घड्याळ चहात ठेवले व नंतर काढून हातात बांधले. तेव्हापासून घड्याळ चालू झाले ते आजपर्यंत चालूच आहे.
– समर्थ राऊळ महाराज