मुंबई : परळकरांच्या दीपावलीत यंदा सूर व दीपोत्सवाच्या साक्षीने उत्साहात अधिक रंग चढला आहे. संयुक्त नवी चाळ उत्सव समितीने लोअर परेल येथे आयोजित केलेल्या दीपोत्सवासह संगीत मैफिलीचा आनंद परळकरांनी मनमुराद लुटला. सांस्कृतिक उपक्रम व संगीताविष्काराने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
गेली दोन वर्ष दिवाळीवर कोरोनाचे सावट होते… नैराश्याचे मळभ होते… निर्बंधांची चौकट होती.. त्यामुळे सण साजरा करण्याची कुणाचीच मानसिक स्थिती नव्हती.. मात्र यंदाचे चित्र वेगळे आहे. कोरोनामुळे आलेले नैराश्य, दुःख, मळभ बाजूला सारुन पुन्हा एकदा नव्या उमेदीचा, आशाआकांक्षाचा दिवा पेटवण्यासाठी “संयुक्त नवी चाळ उत्सव समिती” कडून नविन उर्जा दिली जात आहे. उत्सव समितीच्या वतीने दिवाळी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सोमवार, दिनांक २४ ऑक्टोबर रोजी दिवाळी पहाट (सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत) महाराष्ट्राची लोकधारा – मराठी सुमधुर गीत व नृत्यांचा बहारदार कला अविष्कार व दीपावली निमित्त भव्य शोभा यात्रा व शिवराज्याभिषेक सोहळा (सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत) खिमजी नागजी चाळीतील महिला व पुरुष यांच्यासाठी फॅशन शो (रात्री ९ ते १० वाजेपर्यंत) बालकलाकारांचे नृत्य व धमाल कॉमेडी नाटक (रात्री १० ते १२ वाजेपर्यंत) आयोजित केले आहे.
तर मंगळवार, दिनांक २५ ऑक्टोबर रोजी शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आणि ऐतिहासिक नाणी व दस्तावेज प्रदर्शन (सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत) सुप्रसिद्ध अभ्यासक श्री सुनील कदम (बदलापूर) व श्री रमेश (भाई) सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकालीन वास्तूसंग्रहाचे प्रदर्शन विजय नवनाथ मंडळाच्या पटांगणात होईल.
मंगळवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी किल्ले बनवणे स्पर्धेचे आयोजन ३ व ८ च्या पटांगणात केले आहे.
यानंतर दिनांक २६ ऑक्टोबर रोजी रांगोळी स्पर्धा (संध्याकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत) आयोजित केली असून शनिवार, दिनांक ५ नोव्हेंबर रोजी तुलसी विवाह समारंभाच्या वेळी रात्रौ ९ वाजता बक्षीस समारंभाचे आयोजन केले आहे. यावेळी किल्ले बनवणे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि नवरात्री उत्सव वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक दिले जाणार आहे.
सोमवारी सकाळी झालेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी पहाटगीतं ऐकण्यासाठी गर्दी केली होती. सुमधुर भक्तीगीतं, भावगीतं, देशभक्तीपर गीतांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाला बहार आली. यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीतही सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सदर कार्यक्रम नियोजनबद्ध होण्यासाठी संयुक्त नवी चाळ उत्सव समितीचे अध्यक्ष समीर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव सचिन आमडोसकर, कार्याध्यक्ष महेश लाड, खजिनदार गणेश राऊत, स्वागताध्यक्ष सचिन थोरबोले आणि इतर ज्येष्ठ सहका-यांसह तरुण मुले आणि महिला वर्गही विशेष मेहनत घेत आहे.