कुडूस (प्रतिनिधी) : तालुक्यात दिवाळी सणाच्या मुहूर्तावर कुडूस, खानिवली, शिरीषफाटा, वाडा आदी मुख्य बाजारपेठेतील दुकाने आकाशकंदील, पणत्या, रांगोळी, मावळे, विद्युत रोषणाईची माळ, दिवाळी गण आदी वस्तूंनी अक्षरश: बाजारपेठा संपूर्ण सजल्या आहेत.
अगदीच काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली असली तरी नागरिकांमध्ये दिवाळी सणा निमित्त लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्याकरीता हवा तसा उत्साह दिसून येत नाही. सध्या भात कापणीचा हंगाम जोरात सुरू आहे. त्यात पावसाच्या वाढत्या मुक्कामामुळे भातपिकाची होत असलेली नासाडी याच नैराश्यातून शेतकरीवर्ग दिवाळी बाबतीत निरुत्साही दिसत आहे.
दिवाळी सण म्हटला की, प्रत्येक घरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असते. कितीही महागाई असली तरी काटकसर करून आपल्याला जमेल तसा सण साजरा केला जातो. या कालावधीत भात कापणीची लगबग सुरू असल्याने ग्रामीण भागात हा सण साजरा करताना काही मर्यादा येतात, पण शहरी भागात मोठ्या उत्साहात सण साजरा होतो. दिवाळीच्या दिवशी घरासमोर आकाश कंदील व दरवाजात पणत्या, विजेची तोरणे लावून घरात व अंगणात रोषणाई केली जाते. त्यामुळे दिवाळीसाठी आतापासून वाड्यातील बाजारपेठा सजल्या आहेत.
दिवाळीनिमित्ताने घराघरामध्ये रांगोळी काढून पणत्या व आकाशकंदीलाने रोषणाई केली जाते. व्यापारी या सणाच्या हंगामानुसार आपल्या दुकानात माल विक्री करण्यास ठेवत असतो. परंतू हा माल हंगामानुसार विक्री झाला नाही तर वर्षभर हा माल दुकानात पडून राहतो. परिणामी दुकानदाराचे मोठे नुकसान होत आहे. -श्रीकांत भोईर, कुडूस व्यापारी संघटनेचे सचिव