
मुंबई (वार्ताहर) : दिवाळीला काही दिवस शिल्लक असताना फटाके खरेदीकरिता नागरिकांची गर्दी होत आहे. दरम्यान विना परवाना फटाके विक्रीवर मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. अशा दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंबई पोलिसांनी आदेशात म्हटले आहे.
धोका टाळण्यासाठी मुंबई महापालिका हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी कोणीही विना परवाना फटाके विक्री करताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल”, अशी नोटीस पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी बजावली आहे. हा आदेश १६ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान बंधनकारक असेल. दिवाळीच्या कालावधीत अनधिकृत विक्रेत्यांकडून बाजारात ठिकठिकाणी फटाक्यांची दुकाने लावण्यात येतात. अशा दुकानदारांवर कारवाई केली जाणार आहे.