वसई (प्रतिनिधी) : सध्याच्या धावपळीच्या युगात सर्वांनाच दिवाळीचा फराळ करता येतोच असे नाही. त्यामुळे नोकरदारवर्ग तयार घरगुती फराळाला पसंती देत आहे. यामुळे पालघर जिल्ह्यात अनेक महिलांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. त्यातून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अर्थकारणाला वेग येणार आहे, पण यंदा महागाईमुळे फराळाच्या किमतीत तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दिवाळीत खुसखुशीत चकली, शंकरपाळ्या, बेसनाचे लाडू, चिवडा यासह शेव, करंजीसह विविध प्रकारच्या फराळाला अधिक मागणी असते. हा फराळ तयार करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू आहे; तर नोकरी, व्यवसाय करणाऱ्या अनेक महिलांना हौस असूनही बाहेरून फराळ आणण्याशिवाय पर्याय नसतो. यामुळे गेल्या काही वर्षांपासून घरगुती पदार्थ तयार करणाऱ्या महिला, महिला बचत गट यांना उत्पन्नाचे नवे माध्यम खुले झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात फराळ तयार करण्यासाठी एकाच ठिकाणी महिला एकत्र काम करत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हा फराळ उत्तम प्रकारे पॅक केला जात आहे. तसेच फराळाच्या पदार्थांची चव, स्वच्छता, तेलाचा वापर आणि त्याची गुणवत्ता चांगली ठेवण्यावर भर दिला जात आहे. यंदा २० टक्के फराळासाठी लागणाऱ्या साहित्यात वाढ झाली आहे. त्यामुळे किमतीत फरक असला तरी ग्राहक मात्र महिलांनी तयार केलेल्या घरगुती फराळाला पसंती देत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गेले दोन वर्षे सण साजरे करण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे रोजगारावर गदा आली, व्यवसाय ठप्प झाले. परिणामी दिवाळी साजरी करताना हात आखडता घ्यावा लागला होता. याचा परिणाम घरगुती फराळ तयार करणाऱ्या महिलांच्या व्यवसायावर झाला होता; परंतु यंदा हे निर्बंध मागे घेण्यात आल्याने उत्साह द्विगुणित झाला आहे. यामुळे घरगुती फराळाच्या मागणीत वाढ झाल्याचे महिला बचत गटांकडून सांगण्यात आले. सध्या आलेल्या ऑर्डरप्रमाणे फराळ बनवून तो विक्री केला जात आहे. काही महिलांचा समूह आलेल्या ऑर्डर घरपोच करत आहे. हा घरगुती दिवाळीचा फराळ चविष्ट पदार्थ असल्याने त्याची मागणी वाढू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील महिलांना आर्थिक हातभार लागत आहे.