किशोर गावडे
मुंबई : भांडुप, कांजूर, विक्रोळी, घाटकोपर भागांना पाणी पुरवठा करणारी ९०० मीमी व्यासाची मुख्य जलवाहिनी, भांडुप पश्चिम विभागात क्वारी रोडवर सन २०१५ पासून आतापर्यंत जवळपास २४ वेळा फुटली आहे. आतातर गेल्या ३७ दिवसात ७ वेळा फुटल्याने भांडुप विधानसभा मनसेच्या वतीने आज दुपारी एस विभागाच्या कार्यालयावर निषेध व्यक्त करत जल अभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांना व सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांना घेराव घालण्यात आला.
या पाईप फुटीमुळे क्वारी रोडवर पुरस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांचे होणारे हाल, याबद्दल जाब विचारण्यासाठी आणि प्रशासनाला जागं करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भांडुप विधानसभेच्या वतीने एस विभाग, सहायक आयुक्त श्री. आंबी तसेच पाणी खात्याचे अधिकारी यांना घेराव घालत निषेध धिक्कार व्यक्त केला. यावेळी झालेल्या बैठकीत महिलांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.
यावेळी मनपा प्रशासनाने दुरुस्ती करून घेण्याबाबत खोडसाळ पद्धतीने उत्तरे देण्यास सुरुवात केल्यानंतर महिला आक्रमक झाल्या होत्या. अखेर सहाय्यक आयुक्त आंबी यांनी शिष्टमंडळाला जलवाहिनी दुरुस्तीबाबत व जलदगतीने काम पूर्ण करण्यासाठी सर्वाधिक कामगार लावून काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
क्वारी रोडवरील छत्रपती संभाजी मार्केट ते हनुमान हॉटेल दरम्यानची जीआरपी (फायबर) जलवाहिनी बदलून २०० मी. लांब एम एस (लोखंडी) जलवाहिनी टाकण्याचे काम येत्या दोन दिवसांत सुरू करण्यात येईल. हे काम एक महिन्यात पुर्ण होईल, असे आंबी यांनी सांगितले.
तसेच भांडुप रीझर्वायर (पाण्याची टाकी – रमाबाई नगर) ते मंगतराम पेट्रोल पंप दरम्यान सदर जलवाहिनीला पर्यायी अशी नवी एम. एस. (लोखंडी) जलवाहीनीचे कामही तातडीने तीन टप्प्यांत सुरू करण्यात येईल. जे पुर्ण होण्यास साधारण एक ते दिड वर्षाचा कालावधी लागू शकतो. सदर दोन्ही कामांमध्ये अडथळा येऊ नये व निर्धारित वेळेत काम पूर्ण व्हावे याकरिता संबंधित सर्व खात्यांच्या परवानग्या, पत्र व्यवहार इ. बाबतीत चर्चा झालेली असून दररोज याबाबतचा आढावा घेतला जाईल, असे ते म्हणाले.
त्यातूनही जर पुन्हा, विशेषतः दिवाळी दरम्यान पाणी गळती झालीच तर संपूर्ण विभागात टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आत्ताच नियोजन करण्यात येत आहे, असेही आंबी यांनी सांगितले. यावेळी, माजी नगरसेविका अनिषा अमोल माजगावकर, विभाग अध्यक्षा व माजी नगरसेविका वैष्णवी सरफरे तारकर, उपविभाग अध्यक्षा आशा बनकर, स्नेहा माळगावकर, शाखा अध्यक्षयतीन सावंत, राजश्री पालांडे, अंकिता राणे, मनविसे विभाग संघटक प्रतिक वंजारे, विभाग सचिव, नितिन साळकर, माजी उपविभाग अध्यक्ष अनिल राजभोज आदी मनसे महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.