Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीरमेश लटके हयात असते तर ते शिंदेंबरोबर असते : नारायण राणे

रमेश लटके हयात असते तर ते शिंदेंबरोबर असते : नारायण राणे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आज जर रमेश लटके हयात असते तर ते नक्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असते, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केले.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकच नव्हे तर येणारी मुंबई महापालिका निवडणूकही भारतीय जनता पार्टी जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतली एकही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला जिंकता येणार नाही. दक्षिण मुंबईची जागासुद्धा भाजपाच जिंकेल, असे ते म्हणाले.

आज अंधेरी पूर्व मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरताना ठाकरे गटाकडून करण्यात आलेले शक्ती प्रदर्शन, हे शक्तिप्रदर्शन नसून, एक ना धड भाराभर चिंध्या… याचेच प्रदर्शन होते. जे कमजोर असतात तेच एकमेकांना उब देऊन आपण शक्तिशाली असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतात. सगळे एकत्र आले म्हणजे शक्ती आली, असे होत नाही असेही राणे म्हणाले. उद्धव ठाकरे आता बोलतात की हिम्मत असेल तर समोर येऊन लढा. आधी तेच म्हणत होते की आमचे सरकार पाडून दाखवा. आता पाडून दाखवले… आता निवडणुकीत पण पाडून दाखवू. मातोश्रीत बसून नुसत्या वल्गना करणे सोपे आहे. अहो जरा मातोश्रीचा दरवाजा तरी उघडा… बाहेर बघा… वारा सुटला आहे की पाऊस पडतोय ते… महाराष्ट्रावरचे बोलणे संपले. आता बोलण्यातून मुंबईपण गेली. आता यांच्या तोंडात वरळी आहे. तेही जाईल असे भाकितही त्यांनी केले. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत नारायण राणे यांचीही सभा होईल, असे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी यावेळी जाहीर केले.

बनावट शपथपत्राची चौकशी सुरु

बनावट शपथपत्राची चौकशी सुरु आहे. दोषी आढळणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. लवकरच वास्तव समोर येईल, असे नारायण राणे म्हणाले. सकाळी बाबुलनाथचे दर्शन घेऊन मी प्रचाराला सुरूवात केली आहे. मी एकच सांगतो की, दक्षिण गोवा आणि दक्षिण मुंबई माझ्याकडे आहे. मी तिकडेही जाऊन आलो आणि इकडे मुंबईतही प्रचार सुरु आहे. मी दोन्ही मतदार संघ निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -