नांदगाव (प्रतिनिधी) : गौण खनिज वाहतुकीचा परवाना नसताना अवैधपणे वाळूची चोरटी वाहतूक सुरू असून महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून गौण खनिज उत्खनन सुरू आहे. नुकताच वाळूचा ट्रॅक्टर सोडून देण्याच्या बदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या दोन पोलिसांना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने पकडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या वनविभागाने अवैध वाळू उपसा करणाऱ्या चार ट्रॅक्टर वाहनांवर कारवाई केली आहे. हे ट्रॅक्टर वनविभागाच्या आवारात जमा करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैधपणे वाळूचा उपसा व वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर सोडून देण्याच्या बदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या नांदगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले होते. यामुळे खडबडून जागे झालेल्या वनविभागाने चार ट्रॅक्टर विरोधात कारवाई केली. वास्तविक पाहता तालुक्यातील मन्याड नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सुरू आहे. ही वाळू नाशिक येथे पाठविण्यात येते. अवैधपणे वाळूचा उपसा व वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असतांनाच महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याने वाळू माफियांचे चांगलेच फावले आहे.
त्याचप्रमाणे वनविभागाच्या हद्दीतून देखील मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा केला जात असताना त्यांच्या कडून सुद्धा डोळेझाक केली जात होती. परंतु पोलिसांविरुद्ध कारवाई होताच अचानक जागे झालेल्या वनविभागाने तालुक्यातील चांदोरा शिवारात वनविभागाच्या हद्दीत चार ट्रॅक्टर अवैध वाळू भरत असताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली आहे. अवैध वाळू भरलेले चार ट्रॅक्टर मालकांवर कारवाई करण्यात आली असून सदर वाळू भरलेले चार ट्रॅक्टर वनविभागात हद्दीत जमा करण्यात आले.