Saturday, January 18, 2025
Homeताज्या घडामोडीशिंदेंच्या शिवसैनिकांमुळेच आज शिवसेना उभी; नारायण राणे

शिंदेंच्या शिवसैनिकांमुळेच आज शिवसेना उभी; नारायण राणे

मुंबई (प्रतिनिधी) : ‘मागील निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत एकत्र लढली होती. पण उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली. गद्दारी करणे हे त्यांच्या रक्तात आहे, म्हणून ते सारखे गद्दार, गद्दार म्हणत आहेत. एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक आहेत. त्यांनी साहेबांना साथ दिली म्हणून आज शिवसेना उभी राहिली. ते लोणी आज आदित्य ठाकरे खात आहेत’, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला.

‘आदित्य ठाकरेंना काही माहित नसते. ते बालिश आहेत. मला त्यांच्याबद्दल काही विचारु नका’, असे वक्तव्य राणे यांनी यावेळी केले व उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. तसेच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांचाच होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लघुउद्योग भारती संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन मुंबईत (विलेपार्ले) होत आहे. त्यात राज्यभरातून लघुउद्योजक सहभागी झाले आहेत. शहरासह ग्रामीण भागात लघुउद्योगांना चालना देण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे मानले जात आहे. त्यात उद्योजक आपल्या विविध समस्या मांडतात. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे हे अधिवेशन होऊ शकले नव्हते. या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात नारायण राणे यांनी मार्गदर्शन केले.

‘आम्हाला उगीच बोलायला लावू नका, मातोश्रीच्या आतल्या आणि बाहेरच्या नको त्या गोष्टी सर्व सांगू. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी गप्प बसावे. तुम्ही शिवसैनिकांना काय दिले? असा प्रश्नही राणेंनी विचारला. आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिला तर काय फरक पडतो? विरोधी पक्षात आहेत. आदित्य ठाकरेंबाबत मला प्रश्न विचारू नका,असेही राणे म्हणाले. दरम्यान, शिवाजी पार्कवर शिंदे गटाचाच दसरा मेळावा होईल. कोण फावड्याने शिवाजी पार्क उखडणार? फावडा मातोश्रीवरून आणणार का? असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

‘मी देखील उद्योजक आहे. मी चेंबूरला ग्रेड १ चे हॉटेल सुरू केले. आता फाईव्ह स्टार पर्यंत पोहोचलो आहे. मी मंत्री झालो तेव्हा ७२ अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेऊन गेलो. म्हटले उद्योजक तयार करा. पण आले किती फक्त ७ अर्ज, अशी माहिती या कार्यक्रमात राणे यांनी दिली. आम्ही आमची मुंबई म्हणतो. पण आर्थिक उलाढालीत आपण मराठी एक टक्का नाही. आपल्या देशात मारवाडी १ टक्का आहे आणि उलाढाल किती २३ टक्के आहे. जो राजकारणी स्वतः काही करत नाही तो दुसऱ्याच्या खिशात हात घालतो, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले. मी आधी उद्योजक मग राजकारणी आहे, असेही यावेळी राणेंनी सांगितले. राजकारणात काम करत असताना आमची काही महत्वकांक्षा असते.

मी राज्यात अनेक पदे भूषवली आणि केंद्रात गेलो. पण या उद्योजकांना मानले पाहिजे, जे उद्योग क्षेत्रात देश पुढे जाईल यासाठी काम करत असतात. अनेक उद्योजक तयार झाले तर बेकारी कमी होईल. देश आयात किती करतो? आणि निर्यातीतून किती मिळते? आयात कमी करणे आणि निर्यात वाढवणे यांचे मार्गदर्शन तरुणांना, उद्योजकांना द्यायला हवे, असा सल्ला यावेळी राणेंनी दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -