नाशिक (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सात धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिक शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. शहरासह ग्रामीण भागामध्ये सुरू असलेल्या या पावसामुळे सर्वसामान्यांच्या जनजीवनावर परिणाम झाला आहे. तर शेतकऱ्यांनादेखील मोठे नुकसान होण्याची भीती आता सतवू लागली आहे. गुरुवारी रात्री गोदावरी नदीत सात हजार क्युसेस पाणी सोडण्यात आल्यामुळे रात्रभर शहरात व धरण परिसरात पाऊस सुरू असल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे गोदाकाठचे जनजीवन विस्कळीत झाले असून, मुख्यतः पितृपक्षामुळे धार्मिक कारणासाठी आलेल्या ‘भाविक आणि पुरोहितांची मोठी गैरसोय झाली आहे.
यंदा पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातलेला असताना नाशिक शहरातही पाऊस थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. गुरुवारी धरण परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे रात्री आठ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीत सुमारे सात हजार क्युसेस पाणी सोडण्यात आले. यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदीच्या काठी असलेली बरीच लहान -मोठी मंदिरे सध्या पाण्याखाली गेली आहेत.
नाशिकच्या पुराचे परिमाण ठरणारा दुतोंड्या मारुतीसुद्धा कमरेपर्यंत पाण्याखाली गेला आहे. त्यातच रात्रभर शहरात आणि धरण परिसरात संततधार पाऊस झाल्याने आज शुक्रवारी पुन्हा या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या रामसेतू पुलाला पाणी लागले असल्यामुळे गोदावरी नदीच्या आजूबाजूला पाणीच पाणी झाले आहे. त्यातच सध्या सुरू असलेल्या पितृपक्षामुळे गंगेवर शहरातील व बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची गर्दी झाली असल्याने या पाण्यामुळे सर्वांचेच हाल होताना दिसत आहे. तर नदीकाठी असलेल्या व्यापाऱ्यांचे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.