राज्यावर गेले दोन वर्षं असलेले कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा निर्बंधमुक्त होत आहे. त्याचा आनंद प्रत्येक गणेश भक्तांना आहे. मुंबई- पुण्यासह राज्याच्या अनेक भागांत सार्वजनिक गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी दरवर्षी गर्दी होते. जागतिक कोरोना माहामारीमुळे दोन वर्षं जनजीवन ठप्प झाले होते. त्याचा परिणाम सणांवर झाला होता. घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करताना किती माणसे असावीत, याचे सर्व नियम प्रशासनाने घालून दिले होते. त्यानुसार गेल्या दोन वर्षांत उत्सव पार पडला होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतल्यामुळे, जनतेमध्ये भक्तिमय वातावरण फुललेले दिसत आहे.
मात्र, राज्यात कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट आढळत आहेत. गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी देखावे पाहण्यासाठी गर्दी केली आहे. त्यातून संसर्गाचा वेग वाढेल, अशी भीतीही आरोग्य खात्याने वर्तविली आहे. या विषाणूंच्या विरोधात निर्माण झालेली सामूहिक प्रतिकारशक्ती आणि लसीकरणामुळे कोरोनाचा उद्रेक नियंत्रित करण्यात राज्यातील आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे. मात्र, सरकारने निर्बंध उठविल्यामुळे सर्वसामान्य नागरिक निर्धास्त झाल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. कोणीही मास्क लावून दर्शनाच्या रांगेत उभे राहिलेले दिसत नाही. कोरोना काळात सुरक्षित अंतर पाळून उभे राहण्याची शिस्त आपण विसरून गेल्याचे दिसून येत आहे. आपल्या दृष्टीने एक समाधानाची बाब म्हणजे कोरोनाचे सक्रिय रुग्ण गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने कमी होत असून सुमारे दोन हजारांनी सक्रिय रुग्णसंख्या कमी झाल्याचे निरीक्षण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नोंदविले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, राज्यात नव्याने कोरोनाचा व्हेरिएंटला आला की, त्याच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. त्यातून रुग्णांची संख्या वाढते. मुंबईमध्ये सुरुवातीला हा आकडा वाढतो. त्यानंतर ठाणे आणि पुण्यामध्ये वाढत असल्याचा कल दिसतो. सध्या ‘बीए २.७५’ या व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. यामुळे रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण कमी आहे. कोरोना निदान झाले तरीही बहुतांश रुग्ण घरच्या घरी उपचार घेऊन बरे होत आहेत. मात्र गर्भवती, ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असणाऱ्यांना संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना दिल्या जात आहेत.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. पण या वर्षी मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेने नियमावली जाहीर केली आहे; परंतु गणेशोत्सव मंडळांकडून पालिकेने लागू केलेल्या या सर्व अटींचे पालन होत आहे का? या सध्या कळीचा मुद्दा होऊ शकतो.
मुंबई महानगरपालिकेची कोरोना काळापूर्वीची जुनीच नियमावली यावर्षी देखील गणेशोत्सवात लागू असणार आहे. मलेरिया, लेप्टो, डेंग्यू, स्वाईन फ्लू अशा साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे, त्यामुळे मंडप परिसर स्वच्छ ठेवणे ही मंडळाची जबाबदारी असणार आहे, असे महानगरपालिकेने आपल्या नियमावलीमध्ये स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे आवाजाची पातळी अधिक होणार नाही याची काळजी संबंधित मंडळांनी घेणे गरजेचे आहे, असा नियम आहे; परंतु मुंबईत सर्वत्र डीजे, नाशिक बाजा यांसारख्या कर्णकर्कश आवाजाची वाद्य वाजताना दिसत आहेत. यामुळे ध्वनिप्रदूषणाची पातळी वाढून कानाचे विविध आजार बळावू शकतात, याचे भान गणेश मंडळांनी केलेले दिसत नाहीत. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा झपाट्याने प्रसार होत असल्यामुळे विसर्जनासाठी गणेश भक्तांची गर्दी लक्षात घेता विसर्जनासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी अट मंडळांना परवानगी देताना दिली असली तरी, यंदा सर्वच गणेश मंडळांचे या अटीकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा राक्षस जणू निघूनच गेला आहे. दोन वर्षांपासून आपण कोणत्या स्थितीतून गेलो, हे सर्व भान गणेश देखावा पाहण्यासाठी गर्दी करणारे भाविक तसेच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना विसर पडलेला दिसत आहे. उत्सव आनंदाने साजरा करण्याची मानसिकता आपली झालेली आहे; परंतु कोरोनासारख्या आजाराचे संकट आपण अनुभवले असताना पुन्हा धोका का पत्करायचा हा सवाल उपस्थित होतो. जनतेने आता स्वत:ची काळजी घ्यायला हवी.