इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेनाप्रमुखांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या स्थापनेपासून दर वर्षी होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची शान आणि वैभव म्हणून ओळखले जाते. एक पक्ष, एक झेंडा आणि एक मैदान ही देशभर गेली छप्पन्न वर्षे शिवसेनेची प्रतिमा होती. देशात कोणत्याही राजकीय पक्षांचा नित्यनेमाने दर वर्षी एकाच मैदानावर मेळावा होतो आणि पक्षप्रमुखांचे त्यात खणखणीत भाषण होते, असे शिवसेनेखेरीज दुसरे उदाहरण सांगता येत नाही. महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला भाजप विरोधकांनी एकत्र येऊन मुख्यमंत्रीपद दिले. पंचवीस वर्षे शिवसेना सत्तेवर राहील, अशी स्वप्ने पाहणाऱ्या आणि भविष्यात उद्धव ठाकरे हेच देशाचे नेतृत्व करतील, असे ठामपणे सांगणारे शिवसेनेचे प्रवक्ते आणि नेते मात्र अडीच वर्षांतच तोंडावर आपटले. पाच वर्षांची टर्मही पूर्ण न करता शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला वर्षा सोडून मातोश्रीवर परतण्याची पाळी आली. शिवसेनेचे पंच्चावन्नपैकी चाळीस आमदार, समर्थन करणारे दहा अपक्ष आमदार आणि अठरापैकी बारा खासदार यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकवून एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. आम्हीच खरी शिवसेना म्हणून या सर्वांनी एकमुखाने हाळी दिली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे विरुद्ध शिंदे अशा नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे.
शिवसेना खरी कोणती उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांची हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे कोणाचे, ठाकरे की शिंदे गटाचे, याचाही निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. आता दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर कोणी भरवायचा, याचा निर्णय मुंबई महापालिका ठरविणार आहे. शिवसेनेत उभी फूट पडेल, दोन तृतीय़ांश आमदार- खासदार बंड करतील, अशी कल्पना शिवसेनाप्रमुखांनीही कधी केली नव्हती. दि. १९ जून १९६६ रोजी प्रबोधनकारांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांच्या उपस्थितीत मोजक्या कार्यकर्त्यांच्या समोर सहदेव नाईक या कार्यकर्त्याने नारळ फोडला आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा देत शिवसेनेचा शुभारंभ झाला. शिवसैनिकांचा पहिला दसरा मेळावा, रविवार, दि. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्क मैदानावर झाला. ‘मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा भव्य मेळावा’ असे निमंत्रण पत्रिकेवर म्हटले होते. ‘आपला नम्र महाराष्ट्र सेवक, बाळ ठाकरे’ असा निमंत्रणाच्या शेवटी उल्लेख होता.
शिवसेना नवी आहे, लोक जमले नाहीत, तर फज्जा उडेल, म्हणून हा मेळावा मैदानात न घेता एखाद्या सभागृहात घ्यावा, असे त्यांना काहींनी सुचवले. ‘शिवसेनेचा पहिला मेळावा, तोही बंदिस्त हॉलमध्ये, शक्यच नाही…’ असे बाळासाहेबांनी सुनावले. जे करायचे ते भव्य-दिव्य, उघड्या मैदानातच. जे काही होईल ते उघड्या मैदानात जगाला दिसेल, असा आत्मविश्वास ठेऊन शिवाजी पार्क मैदानावर पहिला दसरा मेळावा झाला. या मेळाव्याला चार लाखांचा जनसमुदाय लोटला होता. तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. या मेळाव्यात प्रबोधनकार भाषण करताना म्हणाले, ‘आपल्याला सीमोल्लंघन करायचे आहे. ते करताना प्रत्येक ठिकाणी छत्रपतींचे नाव घेऊन, संकटात उडी टाकून अन्यायाचा फडशा पाडायचा, असा निश्चय केला पाहिजे?’ प्रा. स. अ. रानडे, पद्माकर अधिकारी, बळवंत मंत्री, भालचंद्र ठाकूर, गोविंदराव शिर्के, अॅड. रामराव आदिक यांनी भाषणे केली. पहिल्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख म्हणाले – ‘महाराष्ट्राला आज खरी गरज महाराष्ट्रवादाची आहे. आज मराठी माणूस जागा झाला आहे. यापुढे तो अन्याय सहन करणार नाही. राज्य सरकारला त्याची दखल घ्यावीच लागेल. जर मराठी माणूस जातीयवादी, प्रांतीयवादी, संकुचित वृत्तीचा असता, तर ही मुंबई कॉस्मोपॉलिटन झालीच नसती. काहीजण आरोप करतात की, शिवसेना नाव देऊन आपण शिवाजी महाराजांना प्रांतियतेचे कुंपण घालीत आहात. पण हे प्रांतियतेचे कुंपण नसून आमच्या श्रद्ध्रचे आहे. ही संघटना जातीय नाही. मराठी माणसाशी संकटाच्या काळात जो मैत्री करतो, तोच मराठी. आज महाराष्ट्राला राजकारणापेक्षा समाजकारणाची गरज आहे. त्यामुळे शिवसेना राजकारणापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजकारण हे गजकरणासारखं आहे…’ उद्धव सेना संपली, आता शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, असे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी ठणकावून सांगितले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धवसेनेने बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
सामान्य जनता कोणाच्या पाठीशी? हे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यानंतर समजेल, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. शिवसेनाप्रमुखांच्या दसरा मेळाव्याचा वारसा केवळ राज ठाकरेच चालवू शकतात, असे मनसेचे नेते संदीप देशपांडे सांगत आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे सर्वसामान्य मराठी माणसालाही आकर्षण राहिले आहे. शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत ठाकरे शैलीतील झणझणीत भाषण मराठी माणसाला आवडायचे. विविध विषयांवरील शिवसेनेची भूमिका रोखठोकपणे मांडली जायची. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर शिवसेनाप्रमुख यथेच्छ तोंडसुख घ्यायचे. दसरा मेळाव्यातील भाषणांनी शिवसैनिकांमध्ये ऊर्जा निर्माण होत असे. आता तर शिवसेनेत दोन तृतीयांश फूट पडली, रोखठोक बोलणारे आहेत तरी कोण? दसरा मेळाव्यात कमांडर दत्ताजी साळवी, प्रमोद नवलकर, मनोहर जोशी, सुधीर जोशी, वामनराव महाडिक अशी एकसे एक तोफा डागणारी नेत्यांची टीम असायची, आता उद्धव गटाकडे घणाघाती वक्तृत्व असलेले उरलेत तरी कोण? जे तगडे नेते आहेत ते भाजपमध्ये किंवा एकनाथ शिंदे गटात गेले. हल्ली संजय राऊत यांचे उद्धव यांच्याअगोदर भाषण व्हायचे. पण तेही आता जेलमध्ये आहेत.
सन २०१२ मध्ये दसरा मेळाव्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिवसेनाप्रमुख शिवाजी पार्कवर उपस्थित नव्हते. त्यांचे ऑनलाइन भाषण ऐकविण्यात आले. याच भाषणात त्यांनी आता उद्धव आणि आदित्यला सांभाळा, असे भावनिक आवाहन शिवसैनिकांना केले. २०१४ ते जून २०२२ शिवसेना महाराष्ट्रात सत्तेवर होती. महापालिकेतही सेनेची सत्ता होतीच. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र व मंत्रीपदावर नातू होता. या काळात शिवसैनिकांचे काय भले झाले, हे कोणी सांगू शकेल का? शिवसेनेच्या दोन्ही गटांना दसरा मेळावा का महत्त्वाचा आहे, मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाच का हवे, शिवसेना आमचीच हा दावा ठोकण्यासाठी, दसरा मेळावा शक्तिप्रदर्शनासाठी आवश्यक आहे का? या वादात महापालिका दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देईल का? या प्रश्नांनी काहूर माजले आहे.
१९८९ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांनी सेनेचा काँग्रेसला पाठिंबा असणार नाही, असे जाहीर केले होते. १९९१च्या दसरा मेळाव्यात मुंबईत भारत-पाकिस्तान क्रिकेटचा सामना होऊ देणार नाही, असे घोषित केले आणि कट्टर शिवसैनिक माजी आमदार शिशिर शिंदे व त्यांच्या मुलुंडमधील कडव्या टीमने वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडून सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले. १९८२ मध्ये मुंबईत अडीच लाख गिरणी कामगार बेमुदत संपावर गेले असताना शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनाप्रमुखांनी केलेल्या भाषणाच्या वेळी शरद पवार आणि जाॅर्ज फर्नांडिस हे दिग्गज नेते व्यासपीठावर हजर होते. १९९६ मध्ये शिवउद्योग सेनेची घोषणा याच मैदानावरून झाली होती. २००६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व २००९ मध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने सेनेचा दसरा मेळावा होऊ शकला नव्हता. वरळीतील जांबोरी मैदानावर दहीहंडीचा जंगी कार्यक्रम आयोजित करून भाजपने यंदा शिवसेनेवर कुरघोडी केलीच, आता शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान हायजॅक केले, तर ठाकरे गटाची मक्तेदारी संपुष्टात येईल.