Wednesday, July 17, 2024
Homeदेशआता कारमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट बंधनकारक : नितीन गडकरी

आता कारमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट बंधनकारक : नितीन गडकरी

तीन दिवसात दंडाची रक्कमही घोषित करणार

नवी दिल्ली : कारमधील सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्ट बंधनकारक असून मागील सीटच्या मध्यभागी बसलेल्या प्रवाशाला देखील सीट बेल्ट आवश्यक असणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाल्यानंतर कार आणि रस्ता सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मागील सीटवर बसलेल्या सायरस मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावला नव्हता असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यादरम्यान, आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील सीट बेल्टचा मुद्दा उपस्थित केला असून, जोपर्यंत लोक सहकार्य करत नाहीत तोपर्यंत रस्ते अपघात रोखण्यासाठीचे प्रयत्न व्यर्थ आहेत असे सांगत खंत व्यक्त केली. देशातील रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी लोकांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. केंद्रीय मंत्र्यांनी काही मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत दावा केला की त्यांनी कारमध्ये प्रवास करताना सीट बेल्ट घालणे टाळले.

सामान्य लोकांच्या गाड्या विसरा. मी चार मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या गाड्यांमधून प्रवास केला होता. मला नावे विचारू नका. मी समोरच्या सीटवर होतो. मी चालकांना बेल्ट कुठे आहेत ते विचारले आणि कार सुरू होण्यापूर्वी मी सीट बेल्ट लावला आहे याची खात्री केली. मागील सीट बेल्टच्या गरजेवर गडकरी म्हणाले की, लोकांना वाटते की, मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना बेल्टची गरज नाही. ही समस्या आहे. मला कोणत्याही अपघातावर कोणतेही भाष्य करायचे नाही. पण दोन्ही फ्रंट-सीटर्स आणि बॅक-सीटरने सीट बेल्ट घालणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोमवारी आयएएच्या ग्लोबल समिट – नेशन्स अॅज ब्रँड्समध्ये बोलत होते. गडकरी म्हणाले की, सर्व कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याच्या दिशेने मंत्रालय प्रयत्नशील आहे. तेच उत्पादक जेव्हा त्यांच्या कारची निर्यात करतात तेव्हा ते ६ एअरबॅग ठेवतात. मग तुम्ही भारतीय गाड्यांमध्ये फक्त ४ एअरबॅग का ठेवता? आमच्या जीवनाला काही किंमत नाही का? एका एअरबॅगची किंमत फक्त ९०० रुपये आहे आणि जेव्हा संख्या वाढेल तेव्हा त्याची किंमत फक्त खाली येईल, असे गडकरी पुढे म्हणाले.

देशभरात दरवर्षी सुमारे पाच लाख अपघातांमध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी सीट बेल्ट सुरक्षित मानले जातात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -