विरार (प्रतिनिधी) : गणेशोत्सव काळात वसई-विरार महापालिकेकडून शहरातील मुख्य भागात कचरा संकलन आणि साफसफाईचे काम व्यवस्थित करण्यात येत असले तरी नालासोपारा आणि वसई पूर्वेच्या औद्योगिक आणि झोपडपट्टी बहुल भागात मात्र कचऱ्याचे ढीग जागोजागी दिसत आहेत. विशेष म्हणजे पालिकेने लावलेल्या दंडात्मक कारवाईच्या सूचनेलाही नागरिकांनी केराची टोपली दाखवली आहे.
विरार, नालासोपारा आणि वसईच्या पूर्व पट्टीत मोठ्या प्रमाणात औद्योगिक व झोपडपट्टीबहुल भाग आहे. आडव्यातिडव्या वसलेल्या चाळी, जागोजागी झालेले अतिक्रमण, ओबडधोबड रस्ते आणि त्यात साचलेला चिखल असे चित्र या ठिकाणी जागोजागी दिसते. दररोज शेकडो टन कचरा या भागातून निघतो; मात्र कचरा पेटी आणि अन्य नियोजनाच्या अभावी हा कचरा रस्त्याशेजारी अथवा वस्तीच्या नाक्यावर टाकलेला दिसतो.
पालिकेच्या नऊ प्रभागांतील कचरा संकलनाकरता पालिकेने २० ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. या भागातील कचराही ठेकेदारांमार्फत उचलला जातो; मात्र या कर्मचारी व कामगारांना ठेकेदार आवश्यक साहित्य पुरवताना दिसत नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांसह कामगारांना रोगराईची बाधा होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे पालिकेने परिसरातील लोकांनी कुठेही कचरा टाकू नये म्हणून २०० रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे सूचना फलक लावलेले आहेत. मात्र नियोजना अभावी व विकासाअभावी नागरिकांनी या सूचना फलकांनाही कचऱ्याची टोपली दाखवली आहे. त्यामुळे या परिसराला दिवसेंदिवस बकाल स्वरूप येताना दिसत आहे. त्या तुलनेने वसई-विरार पालिकेने शहरातील मुख्य बाजारपेठा व रस्त्यांची स्वच्छता व साफसफाई नेटनेटकी ठेवली असून कचरा टाकला जातो, अशा ठिकाणी सुरक्षा रक्षकही तैनात केलेले आहेत.