पालघर (प्रतिनिधी) : तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या सुरक्षेच्या कारणास्तव या प्रकल्पाच्या परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर, हँडग्लायडर तसेच तत्सम हवाई साधनांचा वापर करण्यास १५ ऑक्टोबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नूकताच हा आदेश जारी केला असून भंग केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
तारापूर अणुशक्ती केंद्र हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असून त्याच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडे आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने निश्चित केलेल्या कार्यप्रणालीनुसार, या भागामध्ये ड्रोन अथवा तत्सम हवाई साधने, पॅराग्लाइडर, पॅरामोटर्स, हँडग्लायडर्स यांच्या वापरास मनाई करण्यात आली आहे.
त्यामुळे पालघरचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी याबाबतचे आदेश जारी केले. १८ ऑगस्ट सकाळी १ वाजल्यापासून ते १५ ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत हे मनाई आदेश लागू आहेत. नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने अणुऊर्जा प्रकल्पालगतचे ऑफलाइन झोन जाहीर असल्याने ड्रोन व इतर हवाई साधने वापरण्यास मनाईचा आदेश पारित करून घेण्याबाबत पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी कळवले होते.