Tuesday, April 29, 2025
Homeमहत्वाची बातमीनितेश राणेंकडून गणेशोत्सवासाठी 'मोदी एक्सप्रेस'ची घोषणा

नितेश राणेंकडून गणेशोत्सवासाठी ‘मोदी एक्सप्रेस’ची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सव जवळ आल्याने गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. यामुळेच एक्स्प्रेसचे तिकीट मिळणे अनेकांसाठी अवघड होऊन जाते. एक्स्प्रेसचे तिकीट मिळत नसल्याने अनेकजण अतिरिक्त पैसे मोजून बसने जाणे पसंत करतात. दरम्यान, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यावर्षीही मोदी एक्स्प्रेस धावणार आहे.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी ही माहिती दिली आहे. दादर ते कणकवली दरम्यान ‘मोदी एक्स्प्रेस’ची घोषणा आमदार नीतेश राणे यांनी केली आहे. कोकणवासीयांना हा प्रवास पूर्णपणे मोफत असणार असून, प्रवासादरम्यान एक वेळचे जेवण व त्यासोबत आरतीचे पुस्तक ही दिले जाणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली. सलग दुसऱ्या वर्षी ही ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणात जाणार आहे.

यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, काय मग गाववाल्यांनो गणपतीत गावाक जायचे की नाही? मग चला तयारीला लागा. चला मग भेटू २९ तारखेला. गणपती बाप्पा मोरया! नितेश राणे यांनी ट्विटरला एक व्हिडीओ शेअर केला आहे.

२९ ऑगस्टला सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरुन तुमची हक्काची मोदी एक्स्प्रेस सुटणार आहे’. ‘ही एक्स्प्रेस दादरपासून कणकवलीपर्यंत जाणार असून, वैभववाडीमध्ये थांबणार आहे. मोदी एक्स्प्रेसमध्ये एक वेळेचे जेवण दिले जाणार आहे. आरतीचे पुस्तकही देणार आहोत. सगळी तयारी झालेली आहे,” अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.
तिकीटासाठी भाजपाच्या मंडळ किंवा तालुका अध्यक्षांना फोन करायचा आहे, असे नितेश राणेंनी सांगितले आहे. कणकवली, देवगड आणि वैभववाडी येथील मंडळ आणि तालुका अध्यक्षांना फोन करा, असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.

यंदा ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. कोकण वासियांसाठी गणपती हा खूप मोठा सण आहे. चाकरमानी कितीही व्यस्त असला तरी सर्व बाजूला सारून तो गणपतीत आपल्या गावाकडे जातो. परंतु, या दिवसांत बस असेल ट्रेन असेल यांचे बुकिंग भेटणे फार कठीण असते. त्याचबरोबर याचे दर सुद्धा अव्वाच्या सव्वा असतात. म्हणूनच ‘मोदी एक्सप्रेस’ चा फायदा हा मागच्या वर्षीपासून मुंबईतील बरेच चाकरमानी घेत आले आहेत. यंदाही त्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -