मुंबई (प्रतिनिधी) : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड, रत्नागरी, सिंधुदुर्ग – कोकण भाग पुणे, कोल्हापुर, साताऱ्यातील घाट माथ – पश्चिम महाराष्ट्र मुंबईसाठी ८, ९ आणि १० ऑगस्ट महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचे वादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ८ ते १० ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा सुरूवात केली आहे. कोकणात मागील १२ तासापासून पुन्हा पावसाने सुरूवात केली आहे.
रत्नागिरी-चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस झाला, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यासाठी पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे येथील वाशिष्टी व शिवनदी दुथडी भरून वाहत आहे. वाशिष्ठी नदीची समुद्र सापटीपासून ५ मीटर वर असलेली इशारा पातळी जवळजवळ गाठली आहे. बाजारपेठेतील बाजारपुल, नाईक कंपनी, भेंडीनाका, रंगोबा साबळे मार्ग, वडनाका, एकविरा देवी मंदिर, जुना कालभैरव मंदिर रस्ता या परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. पहाटे पासून शहर आणि ग्रामीण भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. धो-धो पाऊस पडल्याने शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले.
कणकवलीत ढगफुटीसदृश पाऊस
कणकवली तालुक्याच्या काही भागांत आज पहाटे ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्याने पूरस्थिती निर्माण झाली. वागदेतील अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढले. इतर भागालाही पावसाने चांगलेच झोडपून काढले. कुडाळ तालुक्यातील २७ गावांचा संपर्क तुटला होता. अनेक ठिकाणी पडझड झाली. काही मार्गांवरील वाहतूक ठप्प होती.