Tuesday, April 30, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सअवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे

अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे

श्रीनिवास बेलसरे

सिने निर्माते शरद पिळगावकर (सचिन पिळगावकर यांचे वडील) यांचा ‘अष्टविनायक’ आला १९७९ला! प्रमुख भूमिकेत होते सचिन, वंदना पंडित आणि राजा गोसावी. सिनेमात पिळगावकरांनी मराठी चित्रपटसृष्टीतील अर्धी आकाशगंगा उतरवली होती. त्यात चमकत होते-चंद्रकांत, सूर्यकांत, जयश्री गडकर, पद्मा चव्हाण, उषा चव्हाण, आशा काळे, रमेश भाटकर, शरद तळवलकर आणि डॉ. वसंतराव देशपांडे! दिग्दर्शक होते राजदत्त, तर पटकथा, संवाद लिहिले होते मधुसूदन कालेलकरांनी.

सांगलीतील एका उद्योगपतीच्या जीवनात प्रत्यक्षात घडलेल्या घटनेवर आधारित ही कथा! या सिनेमाची गाणी लिहिली ४ गीतकारांनी, ती नावेही एकापेक्षा एक आहेत. शांताबाई शेळके, जगदीश खेबुडकर, शांताराम नांदगावकर आणि मधुसूदन कालेलकर. संगीत होते अनिल-अरुण यांचे. ‘अष्टविनायक’ची सगळीच गाणी कमालीची लोकप्रिय ठरली. ती आजही लोकप्रियच आहेत. आता गणपती उत्सवात आपण कोणत्याही गावाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहत असलो तरी ती किमान १० वेळा आपोआपच ऐकणार आहोत! त्यात “तू सुखकर्ता तू दुखहर्ता”, “प्रथम तुला वंदितो”, “अष्टविनायका तुझा महिमा कसा” ही तीन गाणी हमखास असतात. याशिवाय प्रत्येक दिवाळीत एकदा तरी “आली माझ्या घरी ही दिवाळी” हे गाणे कानावर पडतेच.

यातले शांतबाईंचे एक अप्रतिम गाणे तर एकेकाळी जवळजवळ प्रत्येक मराठी लग्नात गायले जायचेच किंवा किमान बॅण्डवर तरी वाजवले जायचे! संगीतकार अनिल-अरुण यांनी तोडी रागात बेतलेले हे गाणे लागले रे लागले की अख्ख्या मांडवात गंगा जमुना अवतरत असत. वेगवेगळ्या चमकदार झगमगीत पैठण्या नेसलेल्या स्त्रिया हळूच डोळे पुसू लागत आणि पुरुष डोळ्यांत पाणी न येऊ देण्याचा प्रयत्न करत, आपल्याला काहीच झाले नाही, असे दाखवण्यासाठी इकडे तिकडे पाहू लागत. सगळ्या वऱ्हाड्यांना अस्वस्थ करण्याइतकी या गाण्यातली कविता भावविभोर होती आणि तिला दिलेले संगीत, तर त्या आशयाला जिवंत करत होते.

‘दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे
जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने’

सासरी जायला निघताना जरी मुलीला ‘लाडके’ असे संबोधले असले तरी तिच्यासह घरातल्या सर्वांनी आजवर काय काय भोगले. सज्जन, सात्त्विक मात्र अबोल वडील तिचे किती लाड करू शकले ते सर्वांना माहीत असायचे. तरीही लोक मुसमुसून रडायचे, कारण अव्यक्त असले तरी कुटुंबातले परस्पर प्रेम कसे रसरशीत आणि बावनकशी सोन्यासारखे खरे असायचे. ‘करी लाभाविण प्रीती’ असे ते आई-वडिलांचे, बहीण-भावाचे प्रेम त्यावेळी बांध फुटून वाहू लागायचे. ही ताकद होती शांताबाईंच्या लेखणीची!

आपल्याकडे कवींनी स्त्रीच्या भूमिकेत जाऊन स्त्रीमनाचे नाजूक पदर उलगडून दाखवल्याची अनेक उदाहरणे आहेत. तशी अनेक अप्रतिम गाणी आहेत. मात्र एका कवयित्रीने मुलीच्या पाठवणीच्या वेळी बापाच्या मनातील भावना इतक्या उत्कटपणे मांडल्याचे उदाहरण क्वचितच आढळेल!

आपल्याला यापुढे कायमची परकी होणाऱ्या चिमुकलीचे बालपण वडिलांना आठवते आहे. आपण कसे तिच्याही बोबडे बोलून बोलून तिला एकेक शब्द शिकवला आणि आता ते लेकरू किती मोठे झाले ते पाहून वडील अस्वस्थ आहेत –

‘हातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा’

अर्थात आताच्या ‘जॅक अॅण्ड जिल’च्या दिखावू जमान्यात कुठला ‘श्रीगणेशा’ आणि कुठली ‘बाळपोथी’ म्हणा! पण अजून काही पिढ्यांना या शब्दांचा नुसता संकेतही भावुक करत राहणार आहे.

आपण फार काही करू शकलो नसलो तरी मुलीला शिक्षण दिले. याचा मात्र त्या सज्जन मध्यमवर्गीय वडिलांना खूप आनंद आहे –

‘वळवून अक्षरांना केले तुला शहाणे
जातो सुखावुनि मी या गोड आठवाने
दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे…’

पित्याला वाटते आपण इतक्या आर्थिक अडचणीतून मार्ग काढत थाटामाटाने लग्न करून दिल्यावर आता सासरी गेल्यावर तरी मुलीच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा. तिचे अवघे जीवन एक सुरेल गाणे होऊन जावे, अशी जणू त्याची देवाकडे प्रार्थनाच आहे –

‘बोलात बोबडीच्या संगीत जागविले,
लय, ताल, सूर, लेणे सहजीच लेवविले,
एकेक सूर यावा न्हाऊन अमृताने,
अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे.’

शांताबाई शेळकेंनी शेवटच्या कडव्यातील. शेवटची ओळ ऐकू आली की मांडवात एखादा तरी हुंदका हमखास ऐकू यायचा. जुन्या काळी सतत आनंदी ‘दिसणे’, आपला दृष्टिकोन नेहमी सकारात्मकच असतो असे ‘दाखवणे’, आपल्या सर्व भावभावनांवर कडक नियंत्रण असणे म्हणजेच परिपक्व असणे अशी व्याख्या प्रस्थापित झालेली नव्हती. त्यामुळे मुलीची आईच काय आजूबाजूच्या शेजारणीही हमसून-हमसून रडत. बापाला मात्र भावना उघडपणे व्यक्त करता येत नाहीत. त्यांचा अनेकदा भावनिक कोंडमाराच होतो.

‘घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे
हा देह दूर जाता मन राहणार मागे’

तरीही पित्याचे कर्तव्य त्याला पार पाडावेच लागणार. बदलत्या नात्यात येथून पुढे आपल्याला तिच्या घरीही जाताना परक्यासारखे वागावे लागणार हे ओळखून पिता आपले अश्रू आवरतो आहे. केवढे करुण दृश्य!

‘धन आत्मजा दुजाचे, ज्याचे तयास देणे
परक्यापरी आता मी येथे फिरून येणे.’

असा उत्कट, ओल्या भावनांचा उत्सव अधूनमधून पाहायला हवा. उरले-सुरले माणूसपण जपण्यासाठी!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -