Sunday, July 21, 2024
Homeमनोरंजनयेतोय ‘बॉईज ३’चा धिंगाणा...

येतोय ‘बॉईज ३’चा धिंगाणा…

दीपक परब

‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घातला होता. धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर या धमाल त्रिकुटाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली होती आणि त्या दोन्ही पर्वांमध्ये धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर यांच्या आयुष्यातील येणारी मुलगी हा एक वेगळाच विषय ठरला होता. त्यामुळे ‘बॅाईज ३’च्या घोषणेपासूनच यात कोणती अभिनेत्री असणार याबाबत प्रचंड उत्सुकता आणि तर्क-वितर्क लावले जात होते. त्या अभिनेत्रीचा चेहरा नुकताच पुढे आला आहे.

‘बॅाईज ३’च्या घोषणेपासूनच धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर यांच्यासोबत राडा घालायला कोण अभिनेत्री असणार? याची सर्वत्र चर्चा सुरू होती. अखेर ‘ती’चा चेहरा समोर आला आहे. या चित्रपटात विदुला चौगुले हिने ‘त्या’ मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. विदुला ही ‘बॅाईज ३’ च्या निमित्ताने चित्रपटात पदार्पण करत आहे. आता विदुला या त्रिकुटाला भारी पडणार का? हे पाहण्यासाठी मात्र १६ सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

काही दिवसांपूर्वीच या तिघांच्या आयुष्यात आलेली ‘ती’ मुलगी सोशल मीडियावर झळकली होती. मात्र अर्धा चेहरा दिसत असल्याने ‘ती’ नक्की कोण? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर या चेहऱ्यावरून पडदा उठला असून आता प्रेक्षकांना तिचा अभिनय पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. तसेच विदुला नक्की कोणाच्या आयुष्यात येणार? तिच्या येण्याने या तिघांच्या आयुष्यात काय गडबड होणार? त्यांचे आयुष्य एका वेगळ्याच वळणावर जाणार काय? अर्थात या सगळ्यांची उत्तरे ‘बॅाईज ३’ पाहिल्यावरच मिळणार आहेत.

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ३’ हा चित्रपट येत्या १६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात प्रतीक लाड, पार्थ भालेराव आणि सुमंत शिंदे या त्रिकुटासह विदुला चौगुले चित्रपटगृहात दंगा घालायला येत आहे.

‘टाइमपास ३’ची यशस्वी घोडदौड

मराठी सिनेसृष्टीतील अवघ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजे दगडू आणि प्राजू. प्रेक्षकांनी ‘टाइमपास १’ आणि ‘टाइमपास २’मधील दगडू आणि प्राजू यांच्या अनोख्या लव्हस्टोरीला प्रचंड उत्तम प्रतिसाद दिल्यानंतर आता नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘टाइमपास ३’नेही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाने रंगलेल्या ‘टाइमपास ३’ने बॉक्स ऑफिसवर अवघ्या ४ दिवसांमध्ये ४.३६ करोडची कमाई करून धुमाकूळ घातला आहे. अजूनही बॉक्स ऑफिसवर ‘टाइमपास ३’ची यशस्वी घोडदौड सुरू आहे. सध्या पालवीची डॅशिंग, लव्हेबल अदा, दगडूची जबरदस्त कॉमेडी आणि त्यात भर म्हणून दगडूची गँग प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.

‘झी स्टुडिओज’चे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी यांनी चित्रपटाविषयी सांगितले, ‘अवघ्या ४ दिवसांमध्ये ४.३६ करोडोची कमाई करून बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. सध्या हिंदी सिनेमाचा प्रेक्षकांवर पडलेला प्रभाव बघता दगडू आणि पालवीच्या प्रेमाला प्रेक्षकांचा इतक्या कमी दिवसांत इतका उत्साहजनक प्रतिसाद पाहून अभिमान वाटतो.

चित्रपट चांगला असल्यावर प्रेक्षकसुद्धा तो चित्रपट डोक्यावर घेतात, तसाच हा चित्रपट आहे. ज्याला सध्या प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘टाइमपास १’ आणि ‘टाइमपास २’ला जितका प्रतिसाद मिळाला तितकाच प्रतिसाद प्रेक्षक ‘टाइमपास ३’ला ही देत आहेत. चित्रपट पाहून समीक्षक आणि प्रेक्षकांच्या देखील सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.

‘टाइमपास ३’ या चित्रपटात हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब मुख्य भूमिकेत आहे. ‘टाइमपास ३’ या चित्रपटात​ कुमारवयातल्या दगडू आणि पालवीचा आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव यांनी सांभाळली आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सने या चित्रपटाच्या निर्मिती केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -