Thursday, April 24, 2025
Homeकोकणरत्नागिरीकुटुंबांच्या एकत्रित श्रमातून घडतात ‘श्रीं’च्या मूर्ती

कुटुंबांच्या एकत्रित श्रमातून घडतात ‘श्रीं’च्या मूर्ती

प्रशांत हरचेकर

रत्नागिरी : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच गणेशभक्त गणरायाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यातूनच ‘वक्रतुंड आर्ट’ गोळप या गणेशमूर्ती चित्रशाळेतून यावर्षी अभिजीत अशोक सडकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्तकौशल्यातून २७५ गणेशमूर्ती मागणीनुसार तयार केल्या जात आहेत. गेली २० वर्षे अविरतपणे या सर्वाला कुटुंबातील सर्व सदस्य, मित्र परिवार आणि गुरुशिष्य यांची जोड मिळून ‘श्रीं’च्या मूर्ती तयार होतात.

रायगड, सिंधुदुर्ग सागरी महामार्गावरील एस. एम. जोशी यांच्या गोळप गावातील अभिजीत सडकर यांची ‘वक्रतुंड आर्ट’ गोळप ही गणेशचित्रशाळा असून या चित्रशाळेमध्ये विविध प्रकारचे गणपती तयार केले जातात. लोकांच्या मागणीनुसार आकर्षक असे गणपती रायगडमधून आणले जातात. तर काही गणपती शाडूची माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे तयार करुन त्यांचा आकर्षकपणा वाढवला जातो. तयार केलेल्या गणेशमूर्तींना आकर्षक असे रंग देण्याचे काम पद्माकर सडकर, रघुनाथ जोगळे, संदेश मोरे, धनेश रांबाडे, अनंत रांबाडे, अमित गोयनाक, सौरभ शिंदे, लक्ष्मण बंडबे, रफीक भरणकर आदींसह अभिजीतचे वडील अशोक सडकर, आई अमिता तसेच सर्व कारागिरांना त्यांचा रोजचा पाहुणचार सारिका अभिजीत सडकर आणि कुटुंबीय करतात. तयार केलेल्या गणपतींना राजापूरपासून सांगलीपर्यंत मागणी असते. गणपती बनविण्यासाठी वाल्सर वॉटर पेंटचेच कलर वापरले जात असल्याने त्याचे शाइनिंग सर्वच गणेशभक्तांना मोहित करते.

या मूर्ती १ ते १० फुटांपर्यंत घडवित असताना या मूर्तींची किंमत हे ग्राहक ठरवितात. ग्राहकांना जशी पसंत पडेल तशी ऑर्डर घेऊन तेवढ्या प्रमाणाची मूर्ती त्या ग्राहकांना दिली जाते. त्यामुळे महागाईचा कोणताही ताण जाणवत नाही. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना सर्व मूर्तिकलेचे काम दिवसरात्र सुरु असून कुटुंबीयांची मिळणारी साथ ही या कलेला जोड देऊन जाते, असे अभिजीत सडकर आवर्जून सांगतात. सुवर्णकाम करतानाच गणेशभक्तीमुळे गणपती काढण्याची कला अवगत होऊन गेली. गेली वीस वर्षे अविरतपणे मूर्तींची संख्याही वाढत असून यावर्षी २७५ मूर्तींची मागणी ग्राहकांनी नोंदवली आहे. अहोरात्र काम करताना रंगकाम तसेच विविध मूर्तींना खराखुरा वाटणारा पोषाख सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -