मुंबई : दिल्ली दौऱ्याचा आणि मंत्रिमंडळाचा काहीच संबंध नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून, त्यासाठी कोणताही अडथळा नाही. मंत्रिमंडळ विस्ताराला पुढचा आठवडा कशाला लवकर होईल, असे वक्तव्य शिंदे यांनी केले आहे.
राज्यात सत्तांतर होऊन महिन्यांपेक्षा अधिकचा कालवधी उलटला असला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सध्या राज्याचा गाडा हकलताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देखील सध्या दिल्लीतच असून, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पोहोचताच केले आहे.
दरम्यान, सत्ता स्थापन झाल्यापासून शिंदे यांचा हा सहावा दिल्ली दौरा आहे. याशिवाय त्यांनी गुप्त पद्धतीने देखील दौरे केल्याची माहिती आहे. मात्र, महिना होत आला तरी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त शिंदे सरकारला लागलेला नाही. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना सरकार मात्र दिल्लीवारी करत असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.
मंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे
राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन ३६ दिवसांचा कालावधी उलटला आहे. तरी देखील मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकला नाही, त्यामुळे मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात मंत्र्यांअभावी अनेक विभागांच्या कामांवर परिणाम होत असून, त्यामुळे अनेक विकासकामे रखडली आहेत. त्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी जारी केले आहेत.
मंत्रिमंडळ लांबणीवर?
दरम्यान, राजकीय वर्तुळात शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ७ तारखेच्या आधी होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आज सहा तारीख असून अद्याप पर्यंत यासंबंधीच्या कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाही. त्याचच सोमवारी म्हणजेच ८ ऑगस्टला शिवसेना कोणाची शिंदेंची की ठाकरेंची या प्रकरणावर देखील सुनावणी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. कारण, सोमवारच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिल्ली दौरा कशासाठी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी ११ वाजता दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक बोलावली आहे. आज दुपारी साडेचार वाजता ही बैठक होईल. यासाठी फडणवीसही दिल्लीला जाणार असले, तरी वेगळ्या विमानाने दिल्ली गाठण्याची शक्यता आहे.
नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी
रविवारी सकाळी १० वाजता नीती आयोगाच्या बैठकीलाही मुख्यमंत्री हजर राहणार आहेत. दोन शासकीय बैठकांच्या निमित्ताने मुख्यमंत्री दिल्लीत जाणार असले, तरी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणे साहजिक मानले जाते. त्यानंतर उद्या दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री मुंबईत परत येतील.