राजापूर (वार्ताहर) : केंद्र शासनाच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध विकासकामे करताना त्याद्वारे मजुरांना गावामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. त्याचवेळी आता शासकीय कार्यालयाच्या इमारतींसह शाळांच्या इमारतींच्या छतावरील पावसाचे पाणी संकलन करून ते जमिनीत जिरविण्याचा ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये तालुक्यातील चौदा शाळांसह एका प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून त्या-त्या परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्याला एकप्रकारे मदत होणार आहे.
गटविकास अधिकारी सुहास पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये हा रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी निवड झालेल्या सर्व इमारतींचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे सुमारे ९ लाख ७३ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून लवकरच या कामांचा सुरुवात होणार असल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या प्रकल्पासाठी जवळेथर केंद्रशाळा, हसोळतर्फे सौंदळ जांभवली क्र.१, कोंड्येतर्फे सौंदळ शाळा क्र १, मूर शाळा क्र. ४, ताम्हाणे शाळा क्र.३, ताम्हाणे शाळा क्र. २, पडवे शाळा क्र.१, पडवे शाळा क्र. २, कोंडसर खुर्द शाळा क्र.२, पिंद्रावण बांदिवडे, ओणी शाळा क्र३, दोनिवडे शाळा क्र.१, खरवते क्र २, डोंगर तर पेंडखळे प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली आहे.
गावातील मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गंत संबंधित मजुराला शासनाकडून किमान वेतन दिले जाते. याचा लाभ तालुक्यातील अनेकांनी घेताना त्यातून, रोजगार मिळविला आहे. त्यातून अनेक विकासकामे व वैयक्तिक लाभाची कामे झालेली आहेत. आता या योजनेतून आता पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर लोकांना गावामध्ये रोजगार मिळताना भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्याला मदत होणार आहे.