वसई (प्रतिनिधी) : वसई-विरार पालिका हद्दीत कोरोनानंतर आता तापमानातील बदलामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढत आहे. डॉक्टरांच्या दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढलेली पाहण्यास मिळत आहे.
कोरोनानंतर आता वसई-विरार पालिका हद्दीत व्हायरल फिवर, खोकला आणि सर्दीने नागरिकांना हैराण केले आहे. प्रत्येक घरात याची लागण झाली आहे.
या आजारात खोकला, कप, सर्दी आणि ताप येऊन रुग्णाला अशक्तपणा येत आहे. गेल्या दोन वर्षांत थैमान घातलेल्या कोरोनाचा साईड इफेक्ट ही आता ज्यांना कोरोना होऊन गेला आहे; त्यांना दिसत आहे. एका वेळेला घरातील सर्वच्या सर्व जण आजारी पडत आहेत. पालिकेनेही याबाबत नागरिकांनी पावसाळ्यात घ्यावयाच्या काळजीबाबत ठिकठिकाणी बॅनर लावून आवाहन केले आहे.
पावसाळ्यामध्ये ताप, सर्दी खोकला हे आजार तापमानातील बदलामुळे होत असतात. त्यामुळे या दिवसात पाणी उकळून प्यायला हवे. जास्त वेळ एका ठिकाणी पाणी थांबून देऊ नये. अशा आशयाचे बॅनर आम्ही ठिकठिकाणी लावले आहेत.
– डॉ. भक्ती चौधरी, वैद्यकीय अधिकारी, वसई-विरार महानगरपालिका
माझ्या दवाखान्यात रोज २०० रुग्ण येत असतात. त्यापैकी जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त रुग्ण हे ताप, सर्दी, खोकला यांनी त्रस्त असतात. ज्यांना कोरोना होऊन गेला आहे. अशा रुग्णांना याचा लवकर फटका बसत आहे. तरी नागरिकांनीही आपली काळजी आता घ्यायला हवी. – डॉ. प्रशील पाटील, ओम हॉस्पिटल, वसई