माधवी घारपुरे
भीतीने गाळण उडालेल्या देहाची थरथर आपण कधी ना कधी अनुभवली असेल. पाण्याने भिजलेल्या पक्ष्याच्या पंखांची थरथर पाहिली असेल, झाडांच्या पानांची थरथर तर नित्याची, पण आता माझ्या जीवाचे काय होणार? या कल्पनेने घाबरलेल्या जीवाची थरथर फक्त ज्याचा तोच पाहू शकतो आणि हा अनुभव आम्हाला २६ जुलैच्या महालक्ष्मीने प्रवास करणाऱ्या साऱ्यांना आला. अजूनही अंगावर काटा फुलतो.
ग्रामस्थ नसते तर हा लेख लिहिला गेला नसता…
दि. २६/७, महालक्ष्मी ठाणा स्टेशनला राइट टाइम आली. अंबरनाथला १०च्या सुमारास गाडी थांबली असणार म्हणून जवळचा थोडा डबा खाल्ला. शनिवारच्या व्याख्यानाची उजळणी केली आणि रात्री साडेअकराच्या सुमारास पाठ टेकली. साडेतीन-चारला पहाटे जाग आली.
पुणं आलं वाटतं! असं म्हणून जरा बाहेर पाहिलं, तर लाल वाहणारं पाणी दुसऱ्या बाजूला तेच दृष्य. गाडी ठप्प! एकेकजण उठू लागला. बदलापूर आणि वांगणीच्या बरोबर मध्यावर गाडी उभी होती. पाऊस पडत होता. पाणी कमी झाले की, जाईल गाडी, पण वेळेवर पोहोचणार का? असं वाटत असतानाच ६ वाजता ते पाणी रेल्वेच्या डब्याच्या पातळीला यायला अर्धा फक्त बाकी होते. बापरे! साडेसातपर्यंत हायटाइडची वेळ. कोणतीही सूचना नाही. एरव्ही ओहोळासारखी दिसणारी उल्हास नदी गर्वाने फुलली होती. दिमाखात तिचं पाणी सैरावैरा धावत होती. जणू ती म्हणत होती, दाखव रे या लोकांना तुझा इंगा! तुला ‘पड’ म्हटले की पडावं, थांब म्हटलं की थांबावं, हवं तेवढंच पड, तू काय त्यांच्या हातातलं बाहुलं आहेस का?
एसीच्या डब्यात पंखे नाहीत. एसी बंद केलेला जीव गुदमरायला लागला. बेसीन, टॉयलेटला पाणी नाही. जवळचं पाणी संपलं. सूचना होती, टॉयलेट वापरू नका. पण लोकांना अजिबात शक्य नव्हतं. त्यातून मदतीचा हात दिला नव्हता. लोक फोन करत होते, पण आशादायी उत्तर कुठून मिळत नव्हतं. आणखी इंजीन लावून गाडी मागच्या स्टेशनवर घेतील या आशेवर होतो. रानपारखी नावाचे टीसी ‘इंजीन पाठवा’ फोन करून थकले. पाठवतो, इतकंच उत्तर. पण प्रत्यक्षात साडेबारापर्यंत तरी इंजीन दिसलेच!
हेलिकॉप्टर तीन गिरक्या घेऊन गेले, पण पुढे काहीच नाही. पाणी, बिस्कीट, चहा येतोय अशा बातम्या पण साऱ्या अफवाच होत्या. जनरल डब्यातून लोक सामान घेऊन उतरून पाण्यातून वांगणीच्या दिशेने चालू लागले. अकरा-साडेअकरापर्यंत रेल्वे डब्याच्या पायऱ्या दिसू लागल्या होत्या, पण पटरीवर पाणी खूप होते. रेस्क्यू टीम आली. बोटी आल्या कळले.
पण आमच्यापर्यंत काहीच ना सूचना, ना माणसे. महत्त्वाचे सामान घ्या. तुमचा तुम्हीच निर्णय घ्या, असे सांगण्यात
आले. मेनरोड सोडतील, पुढे माहीत नाही. आता मात्र अंगाला घाम फुटला.
मुठभर माणुसकी आहे म्हणून जग चाललंय ही धारणा मात्र प्रत्यक्षात उतरली. चामटोली, कासगाव, वांगणी इथे ग्रामस्थ मदतीला धावले. ना नावाची अपेक्षा ना प्रसिद्धीची हाव, ना नेत्यासारख्या फोटोची इच्छा. केवळ माणुसकी. आम्हीच निर्णय घेतला. वांगणीकडे डोंगर चढावा लागेल म्हणून बदलापूरकडे चालायचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी गाडीतून उतरवले.
मला तर पांडुरंगासारखा ‘अंकुश देसाई’ नावाचा मुलगा भेटला. मला धरत बॅग घेऊन पाण्यातून आणले. तिथे एक बोट होती. ती नौदलाची का माहीत नाही. यूएमसी फायर असे त्यावर लिहिले होते. दोरी ओढून पलीकडे नेले. तेथे एक-एक बिस्कीट पुडा, सामोसा प्रथम मिळाला. चॅनेल्सनी बाइट घेतले आणि अॅम्ब्युलन्स तीन साडेतीन किमी असलेल्या बदलापूर स्टेशनवर गाड्या पूर्ण बंद, एकदम ओला केली. तिला विनंती केली. संपूर्ण चिंब भिजलेले, मनाची थरथर त्याला कळली. जादा पैसे न मागता त्याने ठाण्याला घराशी आणून सोडले. घरातली माणसं भेटली. पाण्याच्या धारा ओघळल्या. पावसाच्या की आनंदाश्रू? कळेना. चौदा तासांची थरथर एका मिनिटात थांबली. होते घरासारखे, नव्हत्या नुसत्या भिंती… याची जाणीव झाली. इतके होते, पण मनातले प्रश्न जात नाहीत अजूनही.