Tuesday, July 16, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकोकणातील भात लावणी

कोकणातील भात लावणी

रवींद्र तांबे

कोकणातील भात लावणी पर्यटकांचे खास आकर्षण जरी असले तरी आपल्या रोजच्या आहारात भात असतो. त्यासाठी पावसाळ्यात शेतकरी भात लावणी करीत असताना त्या ठिकाणी जाऊन पाहावे लागेल. त्याचा आनंद फार वेगळाच असतो. म्हणजे भात लावणी कशी केली जाते, याची माहिती मिळू शकते. भात लावणी कशा प्रकारे केली जाते, याची ओळख तरुण पिढीला होण्यासाठी थोडक्यात घेतलेला आढावा.

निसर्गरम्य कोकणामध्ये दर वर्षी पावसाळ्यात भातपीक घेतले जाते. तसे राज्याच्या इतरही भागात भाताचे पीक केले जाते. पाऊस उशिरा सुरू झाल्याने सध्या शेतीची कामे जोरात चालू आहेत. मात्र काल आज आणि उद्याचा विचार करता, मागील काळात भातशेती उदरनिर्वाहासाठी केली जात होती. म्हणजे वर्षभर पुरेल इतके भात केले जात असे. त्यामध्ये आपल्याला ठेवून जर जास्त भात होत असेल, तर जवळच्या व्यक्तीला उसनवार किंवा परत देण्याच्या शर्तीवर देत असत. त्याचप्रमाणे काम करणाऱ्या कामगाराला सुद्धा भाताच्या स्वरूपात मोबदला दिला जात असे.

आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. शेती करून करायचे काय, उत्पादनापेक्षा खर्च अधिक त्यामुळे तोटा किती दिवस सहन करायचा? यामुळे लोकच शेती सोडून शहराकडे जाऊ लागले आहेत. आजही भातशेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे; परंतु अनियमित पावसामुळे शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. आजही ते होत आहे. कदाचित उद्याची परिस्थिती वेगळी असेल. तेव्हा लोकांचा शहराकडील ओढा कमी करण्यासाठी शासनाकडून योग्य आर्थिक मदत व मार्गदर्शन मिळाले पाहिजे. केवळ घोषणाबाजी करून शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होणार नाही, तर प्रत्यक्षात त्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

आता आपण कोकणातील भात लावणी विषयी माहिती घेऊ. पाऊस पडला की, अगदी दुसऱ्या दिवशी नांगरणी करून शेतकरी भात पेरतात. त्यानंतर ते भात रुजून आल्यानंतर जवळ जवळ १५ दिवसानंतर मुळातून उपटून काढून लावणी लावली जाते.

त्याआधी नांगरणी करून चिखल केला जातो. त्यासाठी उखळ, दुरा व तास अशी नांगरणी करून त्यावर गुटा फिरवून डेफांची बारीक माती केली जाते. म्हणजे उत्तम प्रकारे गलगलीत चिखल केला जातो. कोपऱ्यात पाणी साठण्यासाठी चारी बाजूंनी मातीचा बांध (म्यार) घातला जातो. आता जरी लावणी लावण्याच्या अगोदर खत पेरले जात असले तरी आम्ही लावणी लावत असताना शेण चिखलामध्ये मिक्स करायचो.

गलगलीत चिखल झाल्यानंतर तरवा (दाड) काढायला सुरुवात करतात. महिला तसेच पुरुष मंडळी काही ठिकाणी लोकगीते गाऊन तरवा काढतात. त्यामुळे त्यांची करमणूक तसेच रमतगमत वेळ केव्हा जातो हे समजतसुद्धा नाही. त्यानंतर त्यांच्या हातामध्ये मावेल असा तरवा घेऊन त्याची पेंढी बांधली जाते. नंतर ज्या कोपऱ्यात चिखल केलेला असेल, त्या कोपऱ्यात तीन ते चार फुटाच्या अंतरावर पेंढ्या टाकल्या जातात. त्यानंतर एक-एक पेंढी सोडून किमान एका फुटाच्या अंतरावर तरव्याच्या चार काड्या एकत्र करून चिखलामध्ये लावल्या जातात. त्याला कोकणामध्ये भात लावणी असे म्हणतात.

अलीकडच्या काळात कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनामुळे शेतकरी नवनवीन बी-बियाणांचा वापर करू लागले. तसेच चिखल कसा करायचा त्यामध्ये पाणी किती असावे, कोणत्या खताचा वापर करावा, हे सांगितले जाते. त्यानंतर चिखल केलेल्या कोपऱ्यात लावणी एका सरळ रेषेत दिसावी म्हणून दोरी धरली जाते. म्हणजे बरोबर दोरीच्या जवळ लावणी केल्यावर एका सरळ रेषेत भाताची रोपे दिसतात. तसेच योग्य अंतर असल्यामुळे त्याची वाढही उत्तम प्रकारे होते. आम्ही त्याला जपानी लावणी म्हणायचो. अशी लावणी लांबून पाहिल्यावर सरळ दिसते. लावणी पाहण्यासाठी कोकणात यावे लागेल.

भात लावणीच्या शेवटच्या दिवशी आमचो कोकणातील शेतकरी चिखल धुनी करतात. दुपारी भात लावणी संपली की, संध्याकाळी चिखल धुनी. चिखल धुनी म्हणजे जी माणसे भात लावणीसाठी मदत करतात, त्यांना सर्वांना घरी जेवण करतात. त्यासाठी वर्षाचा आरवता कोंबडा कापला जातो. त्याच्या जोडीला वडे आणि सूरय भात, सगळा कसा ओके. अगदी मजेशीर. कोकणी माणूस साधो भोळो, अगदी फणसाच्या गऱ्यासारखो गोड. जेवणाक बोलावल्यान तरी पैईरा देऊक विसरणार नाय.अशी ही कोकणातील भात लावणी एक पर्यटकांचे आकर्षण जरी ठरत असले तरी तरुण पिढीने तिची माहिती घेऊन ती परंपरा चालविणे आवश्यक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -