Tuesday, April 22, 2025
Homeकोकणरायगड‘राजनाला’ कालव्यामुळे ४० एकर शेती पाण्यात

‘राजनाला’ कालव्यामुळे ४० एकर शेती पाण्यात

भातशेती ओसाड राहणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

कर्जत (वार्ताहर) : लघू पाटबंधारे विभाग हलगर्जीपणामुळे तसेच नियोजन शून्यतेमुळे तालुक्यातील राजनाला कालव्या परिसरातील साळोख तर्फ नीड या गावातील कालव्यालगतची भाताची पेरणी केलेली सुमारे ४० एकर शेती वाहून गेली. त्यामुळे यंदा ही शेती ओसाड ठेवावी लागणार असून शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे सुरुवातीला वरदान ठरणारा राजनाला कालवा गेल्या दोन – तीन वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी ‘शाप’ ठरू लागला आहे. अशी संतप्त भावना या गावातील शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहेत.

कर्जतच्या पूर्व भागात लघू पाटबंधारे विभागाचे सुमारे साठ वर्षांपूर्वी राजनाला कालवा तयार केला त्यामुळे त्या परिसरातील शेती दुबार पिकू लागली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला. हा कालवा सुरुवातीला मातीने बांधण्यात आला होता व जागोजाग शिवारात नियंत्रित पाणी जावे. यासाठी नियोजनबद्ध झडपा ठेवण्यात आल्या होत्या. सुमारे चाळीस वर्षे हा मातीचा राजनाला कालवा शेतकऱ्यांना अहोरात्र व्यवस्थित पाणी पुरवीत होता. या कालव्याला चाळीस – पंचेचाळीस वर्षं झाल्याने त्याच्या मजबुतीकरणासाठी या कालव्याचे काँक्रिटीकरण करण्याचे ठरले आणि त्याचे तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन बऱ्याच अंशी या कालव्याचे नूतनीकरण झाले. त्या काळात दोन – तीन वर्षे या कालव्यातून पाणी सोडले जात नव्हते म्हणून दुबार पीक घेणे शक्य झाले नव्हते.

कालव्याचे काँक्रिटीकरण झाले, परंतु नियोजनाचा अभाव असल्याने पूर्वीच मातीचा कालवा होता तो बरा होता. असे म्हणण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली. त्याचाच फटका साळोख गावातील शेतकऱ्यांना बसला. यंदा दुरुस्तीच्या नावाखाली पाच महिने पाणी दिले नाही. या कालावधीत कामे काय केली? कशी केली? हा संशोधनाचा विषय ठरेल. पिण्यासाठी पाणी सोडावे या लोकप्रतिनिधींच्या सूचनेमुळे घाई गर्दीने तात्पुरती दुरुस्ती करून फेब्रुवारी अखेरीस पाणी सोडले व मे अखेरीस बंद केले. पाणी बंद केल्यानंतर साळोख परिसरातील सायपानानजीक नाल्याचा बांध फोडला. जून १० तारखेपर्यंत कुठेही मोऱ्या बसविल्या नाहीत आणि फोडलेला बांधही भरला नाही. त्यानंतर पाऊस सुरू झाला. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर पावसाने जोर धरला त्यामुळे राजनाला कालव्यातील सर्व पाणी वेगाने शेतात शिरले. त्यामुळे पेरण्या वाया गेल्या. गेल्या पाच – सहा दिवसांच्या संततधार पावसाने शेताचे बांधही राहिले नाहीत.

चार – पाच दिवसांपूर्वी लघू पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले होते. त्यांनी पाहणी केली आणि आम्ही फोडलेला राजनाल्याचा बांध दुरुस्त करतो. पण भर उन्हाळ्यात काम करता आले नाही ते या मुसळधार पावसात काय करणार? असा प्रश्न उपस्थित होतो. विशेष म्हणजे सायपानाजवळ असलेला लोखंडी दरवाजा अद्याप लघु पाटबंधारे विभागाने उघडला नाही. तसेच डोंगरातील पाणी जाण्यासाठी राजनाल्याच्या खालून टाकलेल्या मोऱ्या कित्येक वर्षे दुरुस्त न केल्याने ते पाणीही राजनाल्यावरून आत येते. आमच्यावर आलेले हे संकट मानवनिर्मित आहे. असे अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. या विभागाच्या हलगर्जीपणामुळे आमची शेती मात्र उद्ध्वस्त झाली. केवळ थातूरमातूर कामे करतात. हा विभाग स्थानिक शेतकऱ्यांसाठी आहे की? मुंबईकर फार्म हाऊसवाल्यांसाठी आहे हेच कळत नाही? आमचे झालेले नुकसान भरून द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -